शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून सरकारने महाराष्ट्राची मान खाली घातली!: विखे पाटील

संजय शिंदे
शुक्रवार, 20 जुलै 2018

नागपूर : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार केवळ पैसे वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील पुतळ्याची उंची कमी करत असून, या कृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेल्याचा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करत असल्याच्या मुद्यावरून आज त्यांनी विधानसभेत सरकारवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील 121.2 मीटर उंचीच्या अश्वारुढ पुतळ्याला मान्यता मिळाली होती. त्यामध्ये 83.2 मीटर महाराजांच्या पुतळ्याची उंची तर 38 मीटर तलवारीची उंची होती.

परंतु, भाजप-शिवसेनेच्या सरकारने केवळ खर्च कमी करण्यासाठी पुतळ्याची एकूण 121.2 मीटर उंची तशीच ठेवली. मात्र छत्रपतींच्या पुतळ्याची उंची 83.2 मीटरवरून 75.7 मीटर इतकी कमी केली तर तलवारीची उंची 38 मीटरवरून 45.5 मीटरपर्यंत वाढविली. तसेच छत्रपतींच्या पुतळ्याचा चौथरा 96.2 मीटरवरून 87.4 मीटरपर्यंत कमी करण्यात आला आहे.

यापूर्वीही हा विषय सभागृहात उपस्थित झाला असता सरकारने 56 इंचांची छाती करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली जाणार नाही, असे सभागृहात सांगितले होते. तरीही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने छत्रपतींच्या स्मारकाची उंची कमी करण्यासाठी मान्यता दिल्याचे सांगून विखे पाटील यांनी यासंदर्भात सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.

Web Title: government insult of maharashtra for reducing height of shivaji maharaj statue said vikhe patil