सरकारी वकिलाची न्यायाधीशांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

नागपूर - नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे (वय ४९) यांना सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी मारहाण केली. दुपारी पाऊणच्या सुमारास न्यायालय परिसरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ॲड. दीपेश पराते याच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

नागपूर - नागपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे (वय ४९) यांना सहायक सरकारी वकील दीपेश पराते यांनी मारहाण केली. दुपारी पाऊणच्या सुमारास न्यायालय परिसरात ही घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडाली. ॲड. दीपेश पराते याच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात न्यायालयाच्या बाहेर एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला होता. या घटनेला अद्याप आठ दिवसही पूर्ण व्हायचे असताना परिसरात दुसरी घटना घडल्यामुळे विधी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक सुनील बोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांच्या एका निर्णयावरील नाराजीतून हा प्रकार घडला आहे. न्या. देशपांडे कोर्टरूमच्या बाहेरून जात असताना पराते यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. 

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित वकील मंडळींना काहीच सुचले नाही. पराते यांनी न्यायाधीशांच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर त्यांचा चष्मा पडला. पण वेळीच काही लोक धावून आल्यामुळे थोडक्‍यात निभावले. काहीच वेळात पोलिस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. 

न्या. देशपांडे यांनी २८ नोव्हेंबर २०१८ रोजी पराते यांच्या वडिलांच्या मालमत्तेसंदर्भात एक निर्णय दिला होता. या निर्णयावर पराते यांचा संताप वाढत गेला आणि त्यातूनच त्यांनी न्यायाधीशांना मारहाण केली, असे पोलिसांनी सांगितले.

निकालाचा राग - न्यायाधीश
‘माझ्या न्यायालयात पराते यांच्या वडिलांचा एक दावा प्रलंबित होता. २८ नोव्हेंबरला तो दावा उच्च न्यायालयाने कालमर्यादित केल्यामुळे दोन्ही बाजू पूर्णपणे ऐकल्यानंतर निकाली काढण्यात आला. या प्रकरणात पराते यांच्याविरुद्ध निकाल लागल्यामुळे त्यांनी राग काढण्याच्या उद्देशाने माझ्यावर हल्ला केला,’ असे न्या. किरण देशपांडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

वकिलाचाही आत्महत्येचा प्रयत्न?
न्यायाधीशांना मारहाण केल्यानंतर पराते यांनी सहाव्या मजल्यावरून उडी घेण्याचा प्रयत्न केला. एका पोलिस शिपायाने त्यांना रोखल्यामुळे ही घटना टळली. पोलिसांनी मात्र वकिलाच्या आत्महत्येसंदर्भात आपण चर्चाच ऐकली असून निश्‍चित माहिती हाती आलेली नसल्याचे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

Web Title: Government Lawyer Beating to Judge Crime