सरकारी शाळेत दप्तर वजनदार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सरकारी शाळेत दप्तर वजनदार
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दिलेल्या निर्देशाप्रमाणे गुरुवारी (ता. 29) राज्यातील पन्नास शाळांमधील दप्तराचे ओझे तपासणी करण्यात आली. यात समाविष्ट शहरातील दोन शाळेपैकी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा वजनदार असल्याचे चित्र तपासणीदरम्यान आढळून आले.

सरकारी शाळेत दप्तर वजनदार
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे दिलेल्या निर्देशाप्रमाणे गुरुवारी (ता. 29) राज्यातील पन्नास शाळांमधील दप्तराचे ओझे तपासणी करण्यात आली. यात समाविष्ट शहरातील दोन शाळेपैकी सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा वजनदार असल्याचे चित्र तपासणीदरम्यान आढळून आले.
विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि डोक्‍यावर वाढणाऱ्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. यावर शासनाने उपाय म्हणून नव्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकांची संख्या कमी करीत विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाळांच्या आडमुठे धोरणामुळे तोही प्रयत्न फसला. शाळेत जाताना पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे हे ओझे कमी झाले किंवा नाही, हे तपासण्यासाठी विभागीय उपसंचालकांनी शाळांच्या तपासणीची विशेष मोहीमही राबविली. यासाठी 60 गटशिक्षणाधिकारी, 150 विस्तार अधिकारी आणि 600 केंद्रप्रमुखही कामी लावले. तपासणीदरम्यान अनेकदा शाळेतील विद्यार्थ्यांचे दप्तर मानकांपेक्षा अधिक असल्याचे आढळते. मात्र, राज्य सरकारकडून यावर कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील शाळांची तपासणी करून त्यात विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे तपासण्याचे आदेश दिले. त्यातूनच राज्यातील पन्नास शाळांमध्ये गुरुवारी (ता. 29) शाळेत दप्तराचे ओझे तपासण्यात आले. शहरातील अजनी परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालय आणि संजुबा शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक गौतम गेडाम व शिक्षण विस्तार अधिकारी आ. जी. हरडे यांनी केली. यावेळी उमरेड मार्गावरील संजुबा सीबीएसई शाळेतील दप्तराचे वजन मानकानुसार तर केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दप्तर मानकापेक्षा जास्त वजनदार असल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, अधिकाऱ्यांनी शाळेला मानकाप्रमाणे दप्तराचे वजन असल्याच्या सूचना केल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी आ. जी. हरडे यांनी दिली.
असे आहे मानक
इयत्ता          वजन (किलोग्रॅम)
पहिली ते दुसरी - 1. 5 किलो
तिसरी ते पाचवी - 2-3 किलो
सहावी ते सातवी - 4 किलो
आठवी ते नववी - 4.5 किलो
दहावी - 5 किलो

Web Title: Government school bag news