शासकीय नोकरदारांना घरकुलाचा लाभ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

गोंडपिपरी(चंद्रपूर ) : गरीब, पीडित, कमजोर वर्गातील नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी प्रधानमंत्री आवाज योजना सुरू करण्यात आली. पण गोंडपिपरी तालुक्‍यातील खराळपेठ येथे चक्क शासकीय नोकरदारांना घरकुल देण्याचा प्रताप ग्रामपंचायतीने केला आहे. एवढेच नव्हे, तर मागील यादीत पक्‍के घर असल्याने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करण्यात आले. यामुळे आता पात्र लाभार्थी संतापले आहेत. याप्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

गोंडपिपरी पंचायत समितीअंतर्गत खराळपेठ ग्रामपंचायत येते. या ग्रामपंचायतीत यावेळेस एकूण 94 नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आले. पात्र, लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली. यात चक्क शासकीय सेवेत असलेल्यांच्याही नावाचा समावेश होता. एवढेच नव्हे, तर मागील यादीत पक्‍के घर असल्याने ज्या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले होते. त्यांनाही या यादीत पात्र करण्याचा प्रताप ग्रामपंचायतीने केला आहे. 94 पैकी साधारणतः तीस घरांबाबत हा प्रकार घडला असल्याने वंचित लाभार्थ्यांत संताप व्यक्त होत आहे.
गरीब व गरजूंना घरकुलांचा लाभ न देता आर्थिक देवाणघेवाणीतून अपात्र लाभार्थ्यांना घर देण्यात येत असल्याचा आरोप यशवंत पेंदोर, अनिल नागापुरे व वंचित लाभार्थ्यांनी केला आहे.
या बाबीचा पुरावा आपणाकडे असावा याकरिता 2015 ते 19 यादरम्यान मंजूर करण्यात आलेल्या घरकुलांची यादी माहिती अधिकारातून मागण्यात आली. पण महिना लोटूनही माहिती देण्यात आली नाही. उलट माहिती अधिकार टाकणाऱ्यास जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जात आहेत. या सर्व प्रकारामुळे घरकुलाचे वंचित लाभार्थी प्रचंड संतापले आहेत. त्यांनी याप्रकरणाची चौकशी करावी. दोषींवर कार्यवाही करून पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी याप्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
पक्‍के घर असल्याने मागील यादीत अपात्र असलेले यावेळच्या यादीत पात्र झाले आहेत. यात ग्रामपंचायतीसोबतच पंचायत समितीतील संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करीत या प्रकाराची चौकशी करून न्याय देण्याची मागणी यशवंत पेंदोर, अनिल नागापुरे, योगेश्‍वर पेंदोर, बंडू लोणारे, गुरुदास चटारे, हरिश्‍चंद्र खारकर, सावित्राबाई गुडपले, शिवराम वाकुडकर यांच्यासह समस्त अन्यायग्रस्तांनी केली आहे.

शासकीय नोकरीत समाविष्ट असलेल्यांना घरकुलाचा लाभ देण्याचा हा प्रकार अतिशय निदंणीय व अपराधाचा आहे. याप्रकरणी दोषींवर तातडीने कार्यवाही करून न्याय देण्यात यावा.
यशवंत पेंदोर,
अन्यायग्रस्त लाभार्थी, खराळपेठ

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government servants benefit from housing