डॉ. विक्रम संपत म्हणाले, सरकारने सावरकरांच्या "भारतरत्न'वर शिक्कामोर्तब करावे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

वीर सावरकरांनी दोन राष्ट्रांच्या संकल्पनेवर कधीच विश्वास ठेवला नाही आणि पाकिस्तान स्थापनेला कधीही पाठिंबा दर्शविला नाही. त्यांचे विचार आणि श्रद्धा कार्ल मार्क्‍सद्वारे प्रेरित नाही.

नागपूर : आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान ओळखले नाही. लंडनमधील इंडिया हाउसवर कौनशिला लावत वीर सावरकरांचे भारतातील देशभक्त आणि तत्त्ववेत्ता म्हणून स्मरण तेथील प्रशासन करीत आले आहे. त्याउलट, आपल्याकडे देशरक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या व्यक्‍तीला कलंकित करण्याचा प्रयत्न होतो. वीर सावरकरांचा सरकारने भारतरत्न देऊन सन्मान करावा. सत्ताधारी पक्षाचे हे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन लेखक आणि इतिहासकार डॉ. विक्रम संपत यांनी व्यक्त केले. 
मंथन संस्थेतर्फे "वीर सावरकरांचे भूतकाळातील प्रतिध्वनी' या विषयावर त्याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. 
यावेळी मंथन संस्थेचे श्रीधर गाडगे उपस्थित होते. सावरकरांच्या पुस्तकाचे लेखक डॉ. संपत यांनी भारतातील शालेय शिक्षणानेसुद्धा विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यसैनिकांपासून नेहमीच दूर ठेवले असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांना सावरकरांबद्दल फारच कमी माहिती आहे आणि महाराष्ट्राबाहेरील सावरकरांविषयी काहीच माहिती नाही, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्याबद्दल बोलणारे सर्वप्रथम होते. तसेच, त्यांनी "सर्वजन हिताय, सर्वजन सुखमय' यावर विश्वास ठेवला. 
डॉ. संपत यांनी लोकांना सावरकरांच्या "अभिनव भारत...' कार्याबद्दल माहिती दिली. डॉ. विक्रम संपत यांनी सावरकरांच्या आयुष्यात आणि अंदमानच्या सेल्युलर तुरुंगात कसा संपला याबद्दलसुद्धा माहिती दिली. वीर सावरकरांनी दोन राष्ट्रांच्या संकल्पनेवर कधीच विश्वास ठेवला नाही आणि पाकिस्तान स्थापनेला कधीही पाठिंबा दर्शविला नाही. त्यांचे विचार आणि श्रद्धा कार्ल मार्क्‍सद्वारे प्रेरित नाहीत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. 1905 साली परदेशी वस्तू जाळणारे सावरकरही होते. सावरकरांचा सर्व कामांचा हेतू म्हणजे "स्वराज्य आणि स्वधर्म'. सूत्रसंचालन रसिका जोशी यांनी केले. आभार सागर मिटकरी यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the government should seal Savarkar's "Bharat Ratna"