राज्यात दारूबंदीचा पोरखेळ : चंद्रपुरातून हटविण्याच्या हालचाली तर या जिल्ह्यात होणार दारूबंदी...

मोहित खेडिकर
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात दारूबंदीच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाच सदस्यीय गठित करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर : भाजप सरकारने एप्रिल 2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली. सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी सदोष अंमलबजावणीमुळे तो फसल्याची ओरड आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे गत सरकारचे निर्णय फिरविण्याचा सपाटा महाविकास आघाडी सरकारने लावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी लागू करण्यासाठी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अनुकूलता दर्शवली आहे.

चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात दारूबंदीच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाच सदस्यीय गठित करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप सरकारने एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही. गावागावांत अवैध दारूविक्री सुरू आहे. कोट्यवधींची दारू जप्त करण्यात आली. हजारो दारूतस्करांना अटक करण्यात आली. त्यामुळे दारूबंदी फसवी निघाल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा विषय केंद्रस्थानी होता. कॉंगेस-राष्ट्रवादीचे सरकार आल्यास चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठेल, अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय घडामोडी घडल्या आणि महाआघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. त्यामुळे चंद्रपूरची दारूबंदी हटेल, अशा चर्चांनी पुन्हा जोर धरला. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात दारूबंदीमुळे चंद्रपुरातील सुमारे दोनशे कोटींचा महसूल बुडत असल्याच्या विषयावर चर्चा झाली.

- वाघाच्या दर्शनासाठी जंगलात गेला 'देव'
 

समिती गठनाची तयारी सुरू
पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात प्रथम आगमन केल्यावर घेतलेल्या पत्रपरिषदेत दारूबंदीची समीक्षा करावी, यासाठी समिती नेमण्यात यावी, अशी भूमिका मांडली. यानंतर या विधानाचे राजकीय-सामाजिक तरंग उठले होते. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी अधिकारीवर्गाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना अशी समिक्षा समिती गठित करण्याबाबत तोंडी निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने समिती गठनाची तयारी सुरू केली आहे.
- डॉ. कुणाल खेमणार,  जिल्हाधिकारी, चंद्रपूर

 

यवतमाळमध्ये दारुबंदी करणार  जयंत पाटील
दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून ‘स्वामिनी संघटने’सह येथील महिला आणि सुजाण नागरिक दारुबंदीची मागणी करत आहेत. यावर जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनुकूलता दर्शवली आहे. यवतमाळमध्ये दारुबंदी करावी,  या मागणीचे पत्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठवण्यात आले आहे. त्यासंदर्भात जयंत पाटील यांनी ‘स्वामिनी’च्या शिष्टमंडळाला आश्वस्त केल्याची माहिती ‘स्वामिनी’चे मुख्य संयोजक महेश पवार यांनी दिली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीसाठी 2015 पासून आंदोलनं सुरु आहेत. भाजप सरकारच्या काळात न्याय न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची ‘हल्लाबोल यात्रा’ यवतमाळ जिल्ह्यातून जात असताना ‘स्वामिनी’च्या 200 महिलांनी यात्रा अडवून दारुबंदीचा मुद्दा मांडला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मंत्री जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन, आमचे सरकार आल्यास यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदी करू, असे आश्वासन दिले होते.

 

- बंदला हिंसक वळण; अमरावतीत लाठीहल्ला, नागपूर शांत

 

17 जुलै 2018 रोजी नागपुरातील पावसाळी अधिवेशनादरम्यान जयंत पाटील यांनी सभागृहात ‘स्वामिनी’च्या मागणीची दखल घ्यावी, ही विनंती तत्कालीन सरकारला केली होती. जर भाजप सरकारने यवतमाळ जिल्हा दारुबंदी केली नाही, तर आमचे सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ जिल्हा दारुबंदी करू, असे आश्वासन त्यांनी सभागृहात दिले होते.

 

Image may contain: 8 people, people standing

त्यामुळे आश्वासनाची पूर्तता करावी, यासाठी स्वामिनीच्या शिष्टमंडळाने मुंबईत जयंत पाटील यांची गुरुवारी भेट घेतली. त्यावेळी जयंत पाटील यांनी यवतमाळ दारुबंदीसाठी आम्ही अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांना देखील निवेदन पाठिवण्यात आले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींनी दारूबंदीचा प्रस्ताव पारित केला आहे. दारूविक्रीपासून मिळणारा महसूल राज्य सरकारसाठी महत्त्वाचा असला,  व्यसनामुळे असंख्य परिवारांची वाताहात होत असल्याचे स्वामिनीच्या शिष्टमंडळाने पाटील यांच्यापुढे मांडली.

 

समितीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे
दारूबंदीला पाच वर्ष होत आहेत. त्याची समीक्षा झाली पाहिजे. समितीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. याचा अर्थ दारूबंदी सुरू करा असा होत नाही. दारूबंदीचा जनेतला फायदा होतो की नाही, यासाठीचा हा प्रयत्न आहे. तो निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे.
- विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री, पालकमंत्री चंद्रपूर

 

एका हातात शिवभोजन आणि दुसर्‍या हातात दारू
यवतमाळ जिल्ह्यात गेली काही वर्षे दारूबंदी लागू करण्यासाठी स्त्रिया आंदोलन करीत आहे. त्यांच्या मागणीला समर्थन देण्याचे जयंत पाटलांचे मनोदय याचे मी स्वागत करतो. जिथे दारूबंदी नाही तिथल्या स्त्रिया दारूबंदी मागत आहेत आणि जिथे बंदी आहे त्या चंद्रपूरमधले पालकमंत्री बंदी उठवण्यासाठी हालचाल करीत आहेत. कॅंग्रेस पक्षाच्या घटनेमध्ये दारूबंदीसाठी निष्ठा आहे याची आठवण या पक्षाच्या नेत्यांना मला करून द्यावीशी वाटते. आव्हान दारूबंदी उठवण्याचे नाही तर ती प्रभावीरित्या लागू करण्याचे आहे. दारूबंदीची प्रभावी अमलबजावणी कशी करावी यावर या शासनाने लक्ष देऊन अपुरे काम पूर्ण करावे. काही स्थानिक नेत्यांच्या राजकीय व आर्थिक स्वार्थापायी एक चांगला निर्णय परतविला जाऊ नये. एका हातात शिवभोजन आणि दुसर्‍या हातात दारू असे या सरकारने करू नये, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी दिली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government thinking to withdraw liquor ban from chandrapur