शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मिळविणारा सोसतोय आज बेरोजगारीचे चटके... वाचा ही कहानी 

KUndan Naidua
KUndan Naidua

चंद्रपूर : लहानपणापासूनच खेळाची आवड. शालेय दशेत हॅण्डबॉलला सर्वस्व मानले. शाळा, महाविद्यालय दशेपासून सुरू झालेला खेळाचा प्रवास राज्य, राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचला. सरकारनेही दखल घेऊन क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरव केला. त्यासोबतच क्रीडा मार्गदर्शकाची नोकरीही दिली. लहानपणापासून जोपासलेला छंदच जगण्याचा आधार बनला होता. त्याचा सार्थ अभिमानही वाटू लागला. मात्र, सरकार बदलले की निती बदलते. त्याचा प्रत्यय या पुरस्काप्राप्त क्रीडापटूंनाही आला. 2014 मध्ये राज्यातील नवनियुक्त सरकारने क्रीडा मार्गदर्शकांच्या नोकरीची सेवा समाप्त केली. त्यामुळे आता जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. कधीकाळी मैदान गाजविणारे हात बेरोजगारीचे चटके सहन करीत आहेत. 

चंद्रपुरातील नायडू परिवाराचे क्रीडा क्षेत्रात मोठे आदराने नाव घेतले जाते. त्याचे कारणही तसेच नाही. चंद्रपूर जिल्ह्याच्या इतिहासात तीन खेळाडूंना मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देण्यात आला. त्यातील एकाच कुटुंबातील दोघांना हा पुरस्कार मिळाला. त्यातीलच एक कुंदन नायडू. लहाणपणेपासून त्यांनी आपले जीवन हॅण्डबॉलमध्ये घालविले. 1982 ते 1995 या कालावधीत त्यांनी विविध स्पर्धा गाजविल्या.

ज्युनिअर, सिनिअर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व केले. 1989 मध्ये हॉंगकॉंग येथे आयोजित एशियन हॅण्डबॉल चॅम्यिनशीपसाठीही त्यांची निवड झाली होती. मात्र, काही कारणास्तव ते जाऊ शकले नाही. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन राज्य सरकाराने त्यांना 1994-95 या वर्षात मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, तत्कालीन क्रीडामंत्री गुलाबराव गांवडे यांच्या हस्ते या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्यावर्षी त्यांचे भाऊ राजेश नायडू यांनाही मानाचा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळून नोकरी मिळाली नाहीत. त्यामुळे लहान भाऊ राजेश नायडू यांनी पुरस्कारप्राप्त खेळाडूंना नोकरीत आरक्षण देण्यासाठी शासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र शासनाने त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे राजेश नायडू यांनी 1998 शासनाला पुरस्कार परत आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर 2005 मध्ये शासनाने नवीन क्रीडा धोरण जाहीर केले. त्यात खेळाडूंना नोकरी पाच टक्के आरक्षण जाहीर केले. त्यानंतर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या मध्यस्तीने राजेश नायडू यांना पुरस्कार परत सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला.

याच कालावधीत राज्यभरातील 153 शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना जिल्हा क्रीडासंकुलात क्रीडा मार्गदर्शक म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली. मात्र, सत्तेत आलेल्या सरकारला क्रीडा मार्गदर्शकांचे चांगले दिवस आवडले नाही. त्यांनी राज्यभरातील क्रीडा मार्गदर्शकांच्या सेवासमाप्तीचे आदेश काढले. शासनाचा हा निर्णय क्रीडाक्षेत्र गाजविणाऱ्या या खेळाडूंना मारक ठरला आहे. महाराष्ट्राचे नाव जगात चमकाविणारे हे खेळाडू सध्या बेरोजगार आहेत. 


जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

क्रीडा मार्गदर्शक पद गेले. त्यामुळे जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना कुंदन नायडू यांनी निवेदन दिले. त्यात क्रीडा मार्गदर्शकाची नोकरी परत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर सध्या प्रशासनाने त्यांच्या मागणी अद्याप विचार केला नसल्याची माहिती आहे. 

संपादन : राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com