संशोधन करा, इथे होते महाकाय डायनासोर 

मिलिंद उमरे 
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • सिरोंचाच्या गडचिरोलीच्या जीवाश्‍म भूमीकडे सरकारची पाठ 
  • संशोधक, पर्यटकांना आकर्षण 
  • येथे राहत होते महाकाय डायनॉसोर 
  • पर्यटनाला चालना देणे आवश्‍यक 

गडचिरोली : महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र असलेला गडचिरोली जिल्हा जसा जंगल, वन्यजीव, खनिजांसाठी प्रसिद्ध आहे तसाच अतिप्राचीन जिवाश्‍मांसाठीही प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्‍यात डायनासोरचा पूर्ण सांगाडा यापूर्वीच मिळाला असून वृक्ष, वनस्पती व जलजीवांचे अनेक जीवाश्‍म मिळाले आहेत. कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या ज्युरासिक काळाची साक्ष देणाऱ्या या जीवाश्‍म भूमीचे जतन, संवर्धन व संशोधन आवश्‍यक आहे. शिवाय पर्यटनाला चालना देणे आवश्‍यक आहे. मात्र, याकडे अद्याप फारसे लक्ष देण्यात आलेले दिसून येत नाही. 

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यातील वडदम या परिसरात कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीवाश्‍म भूगर्भ शास्त्रज्ञांना आढळले आहेत. तत्कालीन उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्‍ला यांनी यावर बरेच कार्य केले. त्यानंतरच्या उपवनसंरक्षक श्रीलक्ष्मी अन्नाबत्तुला, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनीही त्या दृष्टीने बरेच प्रयत्न केले. सध्या उपवनसंरक्षक सुमितकुमार या जीवाश्‍मांचे संरक्षण व पर्यटन विकासासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. 

Image may contain: outdoor
गडचिरोली : सिरोंचा तालुक्‍यातील वडदम फॉसिल पार्क येथे जपलेले जिवाश्‍म. 

चंद्रपूरचे भूगर्भशास्त्र तथा निसर्ग अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनीही या परिसराला भेट देत या भूमीचा अभ्यास केला. एवढेच नव्हे तर परदेशी संशोधकांनीही येथे भेट दिली असून, एकेकाळी डायनासोरचा वावर असलेली ही भूमी असल्याच्या दाव्यावर शिक्‍कामोर्तब केले आहे. या परिसरात वृक्ष, डायनासोरसारखे महाकाय प्राणी, वनस्पती, मासळीसारख्या जलजीवांचे जीवाश्‍म मिळाले आहेत.

सविस्तर वाचा - 'सकाळ' फेसबुक पेजवर 

गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 189 किमी तर सिरोंचा तालुक्‍यापासून 19 किमी अंतरावर असलेल्या वडदम येथे मिळालेल्या प्राचीन जिवाश्‍मांना जतन करून वनविभागाने तेथे फॉसिल पार्कची निर्मिती केली आहे. पण, या पार्कचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाही. येथे जीवाश्‍माची माहिती देणारे फलक नाहीत. 

अवघ्या पाच स्थळांपैकी एक

1959 मध्ये या परिसरात कोठापल्ली-पोचमपल्ली गावाजवळ गोदावरी नदीच्या खोऱ्यात संशोधकांना एका डायनासोरचा पूर्ण सांगाडा मिळाला होता. हा सांगाडा कोलकाता येथील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आला आहे. येथे डायनासोरची अंडी, त्यांचे इतर भाग जीवाश्‍म रूपात आहेत. आणखी संशोधन व प्रयत्न केल्यास डायनॉसोरचे आणखी सांगाडे मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. नक्षलग्रस्त भागात असलेल्या सिरोंचाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे देशात डायनॉसोरचे जीवाश्‍म आढळलेल्या अवघ्या पाच स्थळांपैकी हे एक आहे. यावरूनच याचे महत्त्व लक्षात येते. 

उदरातील रहस्ये

सिरोंचा तालुक्‍यातील वडदम व इतर परिसराच्या भूमीच्या उदरात अनेक रहस्ये दडली आहे. तुम्हाला वाचून आश्‍चर्य वाटेल, पण कोट्यवधी वर्षांपूर्वी सिरोंचा हा समुद्राचा भाग होता, असाही काही भूगर्भ शास्त्रज्ञांचा कयास आहे. या भूमीत केवळ लोहखनिज, लाइमस्टोन व इतर मौल्यवान खनिजेच दडली नसून मानव व जीवसृष्टीचा इतिहासही दडला आहे. त्याचा मागोवा घेतल्यास अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होईल. जीवाश्‍माशी संबंधित पेलिओलॉजी, पेलिओबॉटनी शात्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे संशोधनाचे समृद्ध दालन आहे. 

पाषाणयुगीन अवजारे

येथे केवळ डायनासोरसह अनेक जिवांचे कोट्यवधी वर्षांपूर्वीचे जीवाश्‍मच नसून तर, पाषणयुगीन मानवाची अवजारेही आहेत. येथे अनेक वर्षांपासून संशोधन करणारे प्रा. सुरेश चोपणे यांनी ही अवजारे वनविभागाला शोधून दिली होती. पण, अधिक सखोल संशोधनाची गरज आहे. त्यासाठी जिऑलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया (भारतीय भूगर्भ सर्वेक्षण) विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. 

Image may contain: 1 person, closeup
प्रा. सुरेश चोपणे

असंख्य रहस्ये प्रकाशझोतात येतील 
सिरोंचा तालुक्‍यातील वडदम व परिसरात कोट्यवधी वर्षांपूर्वीची डायनॉसोर व इतर जिवांची जीवाश्‍मे आढळली आहेत. याशिवाय येथे जलचर व वृक्ष, वनस्पतींचीही जीवाश्‍मे आढळली आहे. पण, अद्याप अनेक रहस्ये उलगडायची आहेत. त्यासाठी जिऑलॉजीकल विभागाने संशोधन करायला हवे किंवा आमच्यासारख्या हौशी भूगर्भशास्त्राच्या अभ्यासकांना संधी द्यायला हवी. काळाच्या पडद्याआड असलेली असंख्य रहस्ये त्यामुळे प्रकाशझोतात येतील. 
- प्रा. सुरेश चोपणे, 
भूगर्भशास्त्र अभ्यासक तथा संस्थापक, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government's negligence to Gadchiroli Fossil Land