गोविंदा-गोविंदाच्या गजरात चिमुरात निघाली घोडा रथयात्रा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

सन 1704 मध्ये श्रीहरी बालाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर साठ वर्षांनी जानोजी भोसले यांच्या मदतीने मंदिर उभारण्यात आले. देवाजीपंताच्या पुढाकाराने घोडा रथयात्रेला सुरुवात करण्यात आली.

चिमूर (जि. चंद्रपूर) : चिमूरचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजीची यात्रा उत्सवाला 30 जानेवारीपासून प्रारंभ झाला. शुक्रवारी (ता.7) मिती माघ शुद्ध त्रयोदशीला रात्री एक वाजता गोविंदा-गोविंदाच्या गजरात श्रीहरी बालाजींची घोडा रथयात्रा निघाली. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी श्रीहरी बालाजींचे दर्शन घेतले. 

 

श्रीहरींची प्रतिमा अश्‍वावर आरूढ

सन 1704 मध्ये श्रीहरी बालाजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर साठ वर्षांनी जानोजी भोसले यांच्या मदतीने मंदिर उभारण्यात आले. देवाजीपंताच्या पुढाकाराने घोडा रथयात्रेला सुरुवात करण्यात आली. त्या काळात कमी उंचीचा लाकडी घोडा तयार करण्यात आला होता. याच घोड्यावर शेकडो वर्षांपासून बालाजीची यात्रा निघते. सव्वाशे वर्षांपूर्वी तयार केलेला घोडा लहान होता. त्यानंतर नवीन मोठ्या घोड्याची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी मूरपारच्या जंगलातून मोठे लाकूड आणले. चिमूर येथील काष्ठशिल्पकार बापूजी लांडे यांनी त्या लाकडापासून आकर्षक मोठा घोडा तयार केला. तेव्हापासून याच घोड्यावर आरूढ झालेल्या श्रीहरी बालाजींच्या प्रतिमेची यात्रा निघत आहे. 

 

अवश्‍य वाचा- Video : शाळेत खाल्ला पोषण आहार अन्‌ थेट पोहोचले रुग्णालयात 

 

भाविकांच्या डोळ्यांचे फेडले पारणे

श्रीहरींची प्रतिमा अश्‍वावर आरूढ होण्यापूर्वी तिला सजविण्याचा मान जमीनदार नाईक घराण्याला आहे. त्यांचे वंशज मधुसूदन नाईक यांच्याकडून मुकुट आणि सजावट झाल्यानंतर प्रतिमेला रात्री 1 च्या सुमारास मंत्रोच्चारासह आरूढ करण्यात आले. घोड्याला रक्षकासह एक फेरी देण्यात आली. त्याचदरम्यान भाविकांनी गोविंदा गोविंदाचा एकच जयघोष केला. घोडायात्रा डोंगरावर चौक, नेहरू चौक पार केल्यानंतर नाईक चौकात आली. तेथे पारंपरिक पद्धतीने घोड्याला एक फेर देण्यात आला. नाईक चौकातून घोडायात्रा दुकान ओळीमधून मार्गक्रमण करीत परत पहाटे मंदिरापुढे आल्यानंतर घोड्यास तिसरा फेर देऊन यात्रेचा समारोप करण्यात आला. आकर्षक रोषणाई, फटाके, परिसरातील भजन मंडळांचा गजर, नगारा आणि ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या घोडायात्रेने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोविंदा गोविंदाच्या गजरात लाखो भक्तानी श्रीहरीचे दर्शन घेतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govinda-Govinda's horse rides on the Chimura