शासकीय धान्य वाहतूक आता ‘ऑनलाईन वाहतूक’ पासद्वारे...!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामामधून निघालेल्या वाहनाचा संपूर्ण तपशील ऑनलाईन भरण्यात येतो. त्यामुळे सदर वाहनाची माहिती गोदामपालकापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांना सहज उपलब्ध होते. या प्रणालीमुळे वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी सर्व गोदामपालकांना पत्राद्वारे निर्देशीत केले आहे. धान्य वाहतूक ही केवळ शासनमान्य वाहनातूनच करण्यात यावी.

खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत 16 शासकीय गोदामे आहेत. या धान्य गोदामांमध्ये खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामामधून धान्य पाठविण्यात येते. जिल्हा पुरवठा कार्यालयाचे वाहतूक प्रतिनिधी सदर धान्य वितरणाचे नियंत्रण करून अभिलेख तयार करण्याचे काम करतात. या अभिलेखाचे आधारे वाहतूक कंत्राटदाराचे देयक अदा करण्यात येतात. शासनाने निर्देशीत केल्याप्रमाणे धान्य वितरण प्रणाली ही ऑनलाईन वाहतूक पासद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी  प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी पुढाकार घेतला आणि ही व्यवस्था कार्यान्वीत केली आहे.

खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामामधून निघालेल्या वाहनाचा संपूर्ण तपशील ऑनलाईन भरण्यात येतो. त्यामुळे सदर वाहनाची माहिती गोदामपालकापासून ते मंत्रालयापर्यंत सर्वांना सहज उपलब्ध होते. या प्रणालीमुळे वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येण्यास मदत होणार आहे. याशिवाय जिल्हाधिकारी यांनी सर्व गोदामपालकांना पत्राद्वारे निर्देशीत केले आहे. धान्य वाहतूक ही केवळ शासनमान्य वाहनातूनच करण्यात यावी.

सदर वाहनाला हिरवा रंग दिलेला असावा, त्यावर ‘सार्वजनिक वितरण व्यवस्था सुधारीत धान्य वितरण पद्ध्‍ात महाराष्ट्र शासन’ असे लिहीलेले असावे. असे असेल तरच धान्य गोदामात उतरवून घ्यावे अन्यथा उतरवून घेण्यात येवू नये. तसेच धान्य उतरवून घेण्याची संपूर्ण प्रक्रिया ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कार्यक्षेत्रात करून घ्यावीत. तसेच या प्रक्रियेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून घ्यावे. याव्यतिरिक्त द्वारपोच योजनेतंर्गत धान्य रास्त भाव दुकानदारांना देतेवेळी त्याचा पंचनामा न चुकता करावा. पंचनाम्यावर पंचांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. याप्रकारच्या सूचना यापूर्वीच निर्गमीत करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितच सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शक होणार आहे. या सर्व सुचनांची नोंद गोदामपालक, वाहतूकदार यांनी  घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी केले आहे.

Web Title: grain transport in Akola