नितीन गडकरी यांचा षष्ट्यब्दीपूर्ती भव्य सत्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. २७) कस्तुरचंद पार्कवर भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

नागपूर - भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. २७) कस्तुरचंद पार्कवर भाजपच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे.

अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह राहतील. या सोहळ्यास श्री श्री रविशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह देशभरातील आमदार, खासदार मंत्री, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे असल्याचे षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समितीचे संयोजक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

गडकरी २७ तारखेला एकसष्टाव्या वर्षात पर्दापण करीत आहेत. यापैकी चाळीस वर्षे त्यांनी सार्वजनिक जीवनात घालविली. भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. त्यांच्या मनोगतामधून सर्वांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या भावना जाणून घेता याव्या या करिता आम्ही सर्वांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यांचा सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांसोबत चांगला संवाद आणि मैत्री आहे. व्यासंगही मोठा आहे. याच कारणामुळे सर्वच पक्षांतील बडे नेते या कार्यक्रमाला येणार आहेत, असेही बावनकुळे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला गौरव समारोह समितीचे सहसंयोजक गिरीश गांधी, भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, महापालिकेचे सत्तापक्षनेते संदीप जोशी, आमदार विकास कुंभारे, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, रमेश मानकर, संजय फांजे, अजय पाटील, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते. 

सुदेश भोसले व वैशाली सामंत गाणार
शनिवारी साडेपाच वाजता गायक सुदेश भोसले आणि वैशाली सामंत यांच्या मराठी-हिंदी गाण्यांचा कार्यक्रम होईल. सत्काराचा मुख्य सोहळा सायंकाळी साडेसात वाजता प्रारंभ होईल. कार्यक्रमाला सुमारे ५० हजार नागरिक उपस्थित राहतील, असा अंदाज चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

एक कोटींची थैली 
वाढदिवसानिमित्त नितीन गडकरी यांना एक कोटी एक लाख रुपयांची थैली देण्यात येणार आहे. राज्यातील भाजपच्या सर्व आमदार आणि खासदारांनी प्रत्येकी एक लाख रुपये दिले आहेत. हा निधी शंभर सेवाभावी संस्थांना दान केला जाणार आहे. संस्थांच्या नावाची घोषणा नितीन गडकरी करणार आहेत.

Web Title: The grand festivities of Nitin Gadkari