ट्रकच्या धडकेत आजी-नातवाचा मृत्यू

file photo
file photo

नागपूर : नातेवाइकाकडून घरी परत जात असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात आजी व नातवाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक नातेवाईक युवक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज बुधवारी दुपारी दीड वाजता चिंचभवन पुलासमोर झाला. इंदूबाई काशीनाथ खोडे (वय 70, रा. चिंचभवन, काचुरे ले-आउट) आणि इशांत नारायणराव खोडे (वय 16) अशी अपघातात ठार झालेल्या आजी-नातवाची नावे आहेत. तर दुचाकीचालक आदित्य रामभाऊ निंबाळकर (वय 20, रा. एमआयजी कॉलनी, त्रिमूर्तीनगर) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदूबाई खोडे या एका नातेवाइकाच्या घरी होत्या. त्यांना आणण्यासाठी त्यांचा नातू इशांत आणि नातेवाईक आदित्य निंबाळकर हे दोघे दुचाकी घेऊन गेले. आज दुपारी एक वाजताच्या सुमारास ते ट्रिपलसीटने सीताबर्डीतून चिंचभवनकडे निघाले. चिंचभवन पुलाजवळून जात असताना त्यांना मागाहून ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले. इंदूबाई यांच्या कमरेचे आणि पाठीची हाडे मोडली तर इशांतच्या डोक्‍याला गंभीर इजा झाली. त्यामुळे घटनास्थळावरच इंदूबाई आणि इशांतचा मृत्यू झाला. तर आदित्य याच्याही डोक्‍याला मार बसला. तेथील नागरिकांनी धावपळ करीत आदित्यला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
माणुसकी हरवलीय!
दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिंचभवन पुलासारख्या वाहत्या रोडवर एवढा मोठा अपघात झाल्याचे अनेक वाहनचालकांच्या लक्षात आले. मात्र, केवळ ऊन लागते किंवा पोलिसांची झंझट नको म्हणून कुणीही पोलिसांना माहिती देण्याची तसदी घेतली नाही. वाहनचालक अपघात बघून निघून जात असतानाच एका पानठेलाचालकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. या घटनेमुळे माणुसकी हरविल्याचा प्रत्यय आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com