महाबीजच्या सोयाबीन बियाण्याला अनुदान जाहीर 

Grant announced for Mahabij Soybeans seeds
Grant announced for Mahabij Soybeans seeds

अकोला : दीर्घ प्रतिक्षेनंतर महाबीजने अनुदानित सोयाबीन बियाणे उपलब्ध केले असून, एकूण उपलब्ध 6 लाख 96 हजार 604 क्विंटलपैकी जवळपास 2 लाख 80 हजार 400 क्विंटल सोयाबीन बियाण्याला अनुदान दिले जाणार आहे. 

सर्वत्र मशागतीची कामे पूर्ण झाली असून, लवकरच खरीप पेरणीला सुरवात होणार आहे. मात्र खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन बियाण्याला महाबीजकडून अजूनपर्यंत अनुदान जाहीर झाले नसल्याने, शेतकऱ्यांची बियाणे खरेदीची कोंडी झाली होती. ‘सकाळ’ने याबाबत 4 जून व 11 जून ला वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची झालेली कोंडी समोर आणली होती. वृत्ताची दखल घेत, दुसऱ्याच दिवशी महाबीजने अनुदानीत सोयाबीन बियाणे उपलब्ध केले असून, विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ते खरेदी करता येणार आहेत. 

ग्राम बीजोत्पादन योजना -
ग्राम बीजोत्पादन योजनेंतर्गत एका शेतकऱ्याला एक एकरासाठी, 30 किलोची एक सोयाबीन बियाण्याची बॅग अनुदानावर मिळणार आहे. त्यामध्ये जेएस 335 वाणाच्या बियाण्याची जाहीर विक्री किंमत 5600 रुपये असून, त्यावर एक हजार रुपये प्रतिक्‍विंटल अनुदान राहील. योजनेतंर्गत या वाणाचे जवळपास 81 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध राहील. याच योजनेतंर्गत एम.एस.71 व जेएस 9305 वाणाचे जवळपास एक लाख क्विंटल अनुदानित बियाणे उपलब्ध राहणार असून, त्यांची जाहीर विक्री किंमत प्रतिक्विंटल 7000 रुपये व त्यावर 1500 रुपये प्रतिक्विंटल अनुदान राहील. 

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान गळीत धान्य वितरण योजना -
योजनेंतर्गत 15 वर्षाआतील सर्वच वाणांच्या (डी. एस. 228 वगळता) जवळपास 69 हजार क्विंटल बियाण्यांवर अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये प्रतिक्विंटल 7000 रुपये जाहीर विक्री किंमत असून, प्रतिक्विंटल 2500 रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळेल. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान गळीत धान्य प्रात्यक्षिक योजना -
योजनेंतर्गत 15 वर्षाआतील सर्वच वाणांचे (डी. एस. 228 वगळता) 14400 क्विंटल बियाणे 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जाणार असून, ही योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत राबविली जाणार आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य योजना -
यामध्ये आंतरपीक प्रात्यक्षिके (उदा. सोयाबीन + तूर) आहेत. योजनेंतर्गत 15 वर्षाआतील सर्वच वाणांचे (डी. एस. 228 वगळता) 16 हजार क्विंटलहून अधिक बियाणे 100 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. 

प्रात्यक्षिक योजनेचे बियाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत मिळणार असून उर्वरित अनुदानित बियाणे विक्रेत्यांकडे उपलब्ध असेल. ग्राम बिजोत्पादन योजनेंतर्गत परमीट घेणे आवश्यक असून, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडे परमिट राहील. - प्रकाश ताटर, मुख्य विपणन व्यवस्थापक, महाबीज, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com