ग्रीन बसला ‘ब्रेक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नागपूर - चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटात शहरात सुरू करण्यात आलेल्या ग्रीन बसला  अखेर आज ‘ब्रेक’ लागले. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे गेल्याचे  चित्र आहे. त्यांनी ग्रीन बसबाबत निर्णयासाठी २३ ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे. 

नागपूर - चार वर्षांपूर्वी मोठ्या थाटात शहरात सुरू करण्यात आलेल्या ग्रीन बसला  अखेर आज ‘ब्रेक’ लागले. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडे गेल्याचे  चित्र आहे. त्यांनी ग्रीन बसबाबत निर्णयासाठी २३ ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठक बोलावली आहे. 

पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आग्रही आहेत. त्यांनी २०१४ मध्ये सर्वप्रथम नागपुरात ग्रीन बस आणली. या बसमध्ये बसण्यासाठी नागरिकही उत्सुक होते. नागपूरकरांनी या बसचे उत्साहात स्वागत केले. सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून पाच बसेस शहरात आल्या. ग्रीन बस धावणारे नागपूर पहिले शहर ठरले. स्कॅनिया कंपनीच्या वातानुकूलित २५ ग्रीन बस गेल्या दोन वर्षांपासून धावत आहेत. मात्र, या बसचे तिकीट दर लाल बसच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे सामान्य नागपूरकरांनी या बसकडे पाठ फिरवली. एवढेच या बसचे भाडेही महापालिकेने थकविले. एवढेच नव्हे स्कॅनिया कंपनीने महापालिकेला ॲस्क्रो अकाउंट उघडण्याची वारंवार विनंती केली. मात्र, आर्थिक टंचाईतील महापालिकेत ॲस्क्रो अकाउंट उघडण्याची क्षमता नसल्याने स्कॅनिया कंपनीच्या पत्राकडे दुर्लक्ष केले. 

दोन महिन्यांपूर्वी स्कॅनिया कंपनीने १२ ऑगस्टपासून बस बंद करण्याचा इशारा दिला होता. अखेर आजपासून शहरातील  २५ ग्रीन बसची चाके बंद करण्याचा निर्णय स्कॅनिया कंपनीने घेतला. या ग्रीन बस सुरू होणार की नाही? याबाबत २३ ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. 

स्कॅनियाची गाशा गुंडाळण्याची तयारी
स्कॅनिया कंपनीने देशभरातून गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील त्यांचे प्रकल्प  ते बंद करीत आहेत. दक्षिणेतील एका शहरातील उत्पादन केंद्रही कंपनीने बंद केल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. याशिवाय विविध शहरांतील बससेवाही बंद केल्याचे समजते. त्यामुळे ग्रीन बस पुन्हा शहरात धावण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

ग्रीन बसची थकीत रक्कम देण्याची तयारी महापालिकेने दर्शविली. परंतु ते काहीही ऐकून घेण्याच्या तयारीत नाही. यासंदर्भात २३ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बैठक घेणार आहेत. 
- बंटी कुकडे, सभापती, परिवहन समिती, मनपा.

Web Title: green bus issue in nagpur