अकोला जिल्ह्यातील भूजलपातळी १.६९ मीटरने घटली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

अकोला : गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे जाणवलेली पाणीटंचाई बघता जिल्ह्यात भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी मे २०१८ अखेर जिल्ह्याती भूजलपातळी १.६९ मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने दिला आहे. 

अकोला : गतवर्षी झालेला अपुरा पाऊस आणि त्यामुळे जाणवलेली पाणीटंचाई बघता जिल्ह्यात भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणावर झाला. परिणामी मे २०१८ अखेर जिल्ह्याती भूजलपातळी १.६९ मीटरने खालावल्याचा अहवाल भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने दिला आहे. 

अकोला जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यात खारपाणपट्ट्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. गतवर्षी सरासरी एवढाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठे कोरडेच राहिले. उन्हाळ्यात पिण्यासाठीही पाणी शिल्लक नव्हते. त्यामुळे भूजलाचा मोठ्याप्रमाणावर वापर झाला. मार्च २०१८ अखेरपर्यंतच जिल्ह्यातील भूजलपातळी दोन मीटरने खालावली होती. त्यापुढील तीन महिन्यांत जिल्ह्यातील भूजलपातळी आणखी सरासरी १.६९ मीटरने खालावली आहे.

तेल्हारा, अकोट गंभीर वळणावर 
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील भूजलपातळी झपाट्याने खालावत आहे. पश्‍चिम विदर्भातील सर्वाधिक गंभीर वळणावर असलेल्या तालुक्यांमध्ये तेल्हाऱ्याचा समावेश आहे. ३१ मे २०१८ नंतर आलेल्या भूजल अहवालामध्ये तेल्हारा तालुक्याती भूजलपातळी तब्बल २.६७ मीटरने खालावल्याचे दर्शविण्यात आले आहे. यापूर्वी सुमारे पाच मीटरने भूजलपातळी खालवली होती. याचा अर्थ यावर्षी तेल्हारा तालुक्यातील भूजलपातळी सरासरी ७ ते ८ मीटरने खाली केली आहे. अकोट तालुक्यातही २.६४ मीटरने भूजलपातळी खालावली आहे. 

जिल्हा ‘रेड झोन’मध्ये
गतवर्षी कमी पर्जन्यमान झाले. परिणामी भूजलपातळी मोठ्याप्रमाणावर खालावली. त्यातच आता पावसाळ्याचे दोन आठवडे उलटले तरी जिल्ह्यात ५० मि.मी. पाऊसही झाला नाही. त्यामुळे यावर्षी भूजलपातळीत जिल्हा ‘रेड झोन’मध्ये राहणार आहे. भूजलपातळी वाढविण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाययोजना प्रभावीपणे न राबविल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

जिल्ह्यातील खालावलेली भूजलपातळी (मीटरमध्ये)
तेल्हारा : २.६७

, अकोट : २.६४, 

अकोला : १.७८, 

बार्शीटाकळी : १.४६, 

मूर्तीजापूर : १.३९, 

पातूर : १.१६, 

बाळापूर : ०.७२, 

सरासरी : १.६९  

Web Title: The ground water level in Akola district declined by 1.69 meters