कुख्यात गुंड बाल्या गावंडेचा खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

तलवार व चाकूने केले 30 घाव - एकाच दिवशी दोघांची हत्या
नागपूर - कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गावंडेचा तलवार व चाकूने 30 घाव घालून खून करण्यात आला. एकाच दिवशी दोन खून झाले असून, शहरातील गुंडांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. सदरमध्ये क्षुल्लक कारणावरून मुन्ना कासन्ना कापराती या मजुराचा खून झाला.

तलवार व चाकूने केले 30 घाव - एकाच दिवशी दोघांची हत्या
नागपूर - कुख्यात गुंड बाल्या ऊर्फ रवींद्र गावंडेचा तलवार व चाकूने 30 घाव घालून खून करण्यात आला. एकाच दिवशी दोन खून झाले असून, शहरातील गुंडांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. सदरमध्ये क्षुल्लक कारणावरून मुन्ना कासन्ना कापराती या मजुराचा खून झाला.

बाल्या गावंडे (38, रा. गोधनी, मानकापूर) हा गुंड होता. वर्षभरापूर्वी तो लाकडीपूल परिसरात पत्नी व 11 वर्षांच्या मुलीसह राहायला आला. तो कामठीतील कुख्यात गुंडाच्या टोळीतील सदस्य म्हणून प्रसिद्ध होता. त्यामुळे इतवारीतील डॉनशी त्याचा वाद होता. त्याची सावजी ऊर्फ योगेश कुंभारे याच्याशी मैत्री होती. बाल्याचा अवैध सट्टापटी-वरलीचा व्यवसाय होता. सावजीला व्यवसायात सहभागी केल्यामुळे दोघांमध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले.

रविवारी सायंकाळी सावजीच्या घरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम होता. त्यासाठी बाल्या पत्नी व मुलीसह आला. रात्री जेवण करण्यापूर्वी दोघांनी काही मित्रांसोबत टेरेसवर दारू पिली. कार्यक्रम संपल्यानंतर बाल्याची पत्नी मुलीसह घरी निघून गेली. दोघेही रात्री बारापर्यंत दारू पीत बसले होते. त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद झाला. त्यामुळे योगेश, त्याची पत्नी पिंकी ऊर्फ गंगाबाई, शुभम धनोरे, राजकुमार यादव आणि अन्य साथीदारांनी बाल्यावर चाकूने हल्ला केला. त्यातच बाल्या ठार झाला. त्यानंतर बाल्याचा मृतदेह तुकाराम नगरातील खुल्या मैदानात फेकला. बाल्याच्या अंगावर चाकू व तलवारीचे 30 पेक्षा जास्त घाव होते. या प्रकरणी कळमना पोलिसांनी योगेश कुंभारे व त्याची पत्नी पिंकी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या घटनेत, दिनेश डिगांबर भिमटे (26, रा. मोतीबाग रेल्वे क्रॉसिंग चौक) याचे सदरमध्ये वेल्डिंगचे दुकान आहे. वेल्डिंग मशीनला असलेले मीटर मुन्ना असन्ना कापराती (46) यांनी चोरले होते. ही माहिती मिळताच सोमवारी सकाळी आठ वाजता दिनेश हा दुकानावर आला. त्यावेळी मुन्ना हे टपरीवर चहा घेत होते. मीटर चोरीवरून दोघांत वाद झाला. त्यानंतर दिनेशने मुन्ना यांच्या छातीत शस्त्र भोसकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यानंतर दिनेश पळून गेला. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दिनेश भिमटेला अटक केली.

बाल्यावर अनेक गुन्हे
भरत मोहाडीकर याच्या हत्याकांडातील बाल्या गावंडे हा आरोपी होता, तसेच भवानी सिंग हत्याकांडातही बाल्या आरोपी होता. यासोबत त्याच्यावर दोन वेळा 307 गुन्हा दाखल होता. यासह त्याच्यावर सट्टापट्टी-मटका, तसेच अन्य गुन्हे दाखल होते. त्याचे कामठीतील मोठ्या गुंडासोबतही संबंध होते.

सावजी झाला "सरेंडर'
बाल्याचा खून केल्यानंतर सावजी कुंभारे हा कळमना पोलिस ठाण्यात दुपारी एक वाजता हजर झाला. त्याने एकट्याने बाल्याचा खून केल्याची कबुली दिली. मात्र, यात जवळपास पाच ते सहा आरोपींचा समावेश आहे, असा अंदाज आहे. त्यामुळे लवकरच अन्य आरोपींनाही अटक करणार असल्याचे कळमना पोलिसांनी सांगितले.

Web Title: gund balya gavande murder