गुटख्याची गोदामे हाऊसफुल्ल

file photo
file photo

अमरावती : शासनाने गुटखा विक्रीसाठी प्रतिबंध घातला असताना शहरात तसेच ग्रामीण भागात गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरूच आहे. शहरातील मोठी गोदामे सणासुदीच्या दिवसांत हाऊसफुल्ल असताना अन्नऔषध प्रशासनाच्या कारवाईला काही महिन्यांपासून अचानक ब्रेक लागला.
शहरात रेल्वेस्थानक चौक, रामपुरीकॅम्प, मसानगंज, रतनगंज, नागपुरीगेट, चांदणीचौक, बडनेरा, नांदगावपेठ, खोलापुरीगेट, सराफालाइन, वॉलकट कम्पाउंड या भागात गुटखा साठविणारी मोठमोठी गोदामे आहेत. अशा मोठ्या गोदामातून प्रतिबंधित गुटखा व पानमसालाची अवैध विक्री, तस्करी केल्या जाते. शहरात एकही पानटपरी अशी सापडणार नाही की, ज्या ठिकाणी प्रतिबंधित गुटखा सहज मिळत नाही. अन्न, औषध प्रशासन विभागाकडे गुटखा तस्करीला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी असते. असे असताना याच विभागाकडून मागील दीड ते दोन महिन्यांत गुटखा जप्तीची ठोस कारवाई झालेली नाही. सणासुदीच्या दिवसांत अवैध साठेबाजी करणाऱ्यांवर अंकुश लावण्याऐवजी, त्यांना साठेबाजी व तस्करीला प्रोत्साहन प्रशासकीय हलगर्जीपणा दाखविल्यामुळे मिळत आहे. परप्रांतातून जो माल गॅरेजवर उतरविल्या जातो, त्यावर विशिष्ट प्रकारे नाव आणि कुणाला सहज ओळखता येऊ नये म्हणून काही संकेत दाखविल्या जाते. कोट्यवधीचा माल आणि शहराबाहेरील गोदामात उतरविल्यानंतर काही व्यापाऱ्यांच्या शहरातील गोदामापर्यंत आणि गोदामातून शहरातील पानटपरीपर्यंत प्रतिबंधित गुटख्याचा माल पुरविल्या जातो. पोलिसांकडूनही गुटखा तस्करांवर अद्याप ठोस कारवाई मागील काही महिन्यात झालेली दिसत नाही. पोलिसांनी गुटखा जप्त केला तरी, त्यापुढची कारवाई ही अन्न, औषध प्रशासन विभागाला करावी लागते. मनुष्यबळाचे तुणतुणे वाजविण्याचे काम अद्यापही सुरूच आहे. 

मोठे व्यापारी मोकाट... पानटपरी टार्गेट
राज्यात गुटखा विक्रीवर प्रतिबंध घातल्यानंतर अनेक नवनवीन चेहरे गुटखा तस्करीच्या व्यवसायात उतरले आहेत. कारण की, दाम दुप्पट करून तस्करीचा हा माल विकल्या जातो. कारवाई झालीच तर, पानटपरी चालविणाऱ्यांवर होते. परंतु मोठे तस्कर हे नेहमीच मोकाट फिरतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com