सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा कायदा केवळ कागदावरच

सिद्धांत उंबरकर
रविवार, 6 मे 2018

गुटका विक्री जोमात 
​महाराष्ट्रात गुटख्यावरही बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही अनेक ठिकाणी सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याचाच अर्थ गुटख्यावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच केवळ कायदे करून भागणार नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडेही तितकेच लक्ष द्यायला हवे.

खामगाव : तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. तरीही या कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशित करण्यात आले. परंतु सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान सुरूच आहे. हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते.

राज्य सरकारने २00८ मध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मज्जाव करणारा कायदा आणला; परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने हा कायदा कागदावरच सीमित राहिला आहे.  खामगावात तर हा कायदा पूर्णत: धाब्यावर बसविल्याचे दिसून येते.     

खामगाव बस सस्थानकासह अनेक ठिकाणी अनेकजण खुलेआमपणे बिडी, सिगारेट पिताना दिसून येतात. त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे यामुळे या परिसरात नियमित व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या आरोग्याला धूम्रपानाचे नाहक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. अनेक शासकीय कार्यालयासमोर  तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असून धूम्रपान करतानाचे चित्र दिसून येते. कायद्याने धूम्रपान निषिद्ध म्हणून जाहीर केलेल्या ठिकाणांवर सर्रासपणे धूम्रपान केले जात आहे, तर हॉटेल्स व बीअर बारमधील नो स्मोकिंंगचे फलक नावापुरते उरले आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने हा कायदा आणला होता. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यात अंतर्भूत करण्यात आलेली आहे. तसेच या कायद्यान्वये १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे व सेवन करण्यास मनाई आहे. मात्र, प्रभावी अंमलबजावणीअभावी हा कायदा पूर्णत: निष्प्रभ ठरल्याचे दिसून येते. शहरातील सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे सिगारेटचे झुरके मारताना तरुण मंडळी दिसून येतात. बस थांबे, रेल्वेस्थानकांचा परिसर, शहरातील कॉफी शॉप आदी ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या तरुणाईचे जथ्ये दिसून येतात. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या या बिनधास्त धूम्रपानाचा फटका परिसरातील इतर नागरिकांना बसत आहे.  प्राथमिक शाळात शिकणाऱ्या लहान मुलामुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

शाळकरी मुले-मुली यांच्यासह नोकरशाहीतील कर्मचारी, शिक्षकांसह अनेकजण सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे ८० हजार रुग्णांना तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. सर्वेक्षणानुसार भारतात दररोज २, ५०० व्यक्ती तंबाखूमुळे मृत्युमुखी पडतात.  खामगाव जिल्ह्यात खर्रा या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे अनेकांना तोंडाचे आजारसुद्धा बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे. शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्यांच्या दाराला लागूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीचे दुकाने थाटात उभे आहेत. शिक्षक, प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी खुलेआम सदर दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ खरेदी करुन सेवन करीत आहेत. त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गुटका विक्री जोमात 
महाराष्ट्रात गुटख्यावरही बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरीही अनेक ठिकाणी सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याचाच अर्थ गुटख्यावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. म्हणूनच केवळ कायदे करून भागणार नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडेही तितकेच लक्ष द्यायला हवे.

Web Title: gutkha ban on paper