ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे पंचामृती व्यक्तिमत्त्व

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

नागपूर : ज्ञानाची सतत उपासना करणारे ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे सद्‌गुणांचे एकत्रित रसायन असलेले पंचामृती व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.
ज्ञानसाधू वासुदेव चोरघडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त अभ्यंकरनगरातील नूतन भारत विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सद्‌गुरूदास महाराज उपाख्य विजयराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. धारवाड येथील पं. राजेश्‍वरशास्त्री जोशी, पं. कृष्णशास्त्री आर्वीकर, अभय चोरघडे व्यासपीठावर उपस्थित होते.

या सोहळ्यात नागपुरातील प्रसिद्ध निवेदक मुकुंद देशपांडे, प्रभा देऊस्कर, रेणुका देशकर, प्रकाश एदलाबादकर, मनीषा देशमुख, वृषाली देशपांडे, मनोज साल्फेकर, सुचिता खनगई, श्‍वेता शेलगावकर यांचा सत्कार करण्यात आला. किशोर गलांडे यांच्या वतीने त्यांची कन्या आसावरी देशपांडेने सत्कार स्वीकारला. या सोबतच क्रिकेटपटू मोना मेश्रामची आई छाया मेश्राम आणि परिसरात दूधवाटप करणाऱ्या गौरी प्रपंचे यांचाही सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे, स्मृतिचिन्ह, वासुदेवराव चोरघडे लिखित पुस्तकं असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. चांदे म्हणाले की, वासुदेव चोरघडे सकारात्मकता, समरसता, व्यापक जनसंपर्क, श्रद्धावान, प्रासादिकत्व यासारखे अनेक गुणांचे धनी होते. पहिले कीर्तन महोत्सव आयोजनाचा मान त्यांनाच आहे. लेखक, अनुवादक, स्क्रिप्ट रायटर, अभिनय अशा अनेक क्षेत्रांत वावरनारे ते अष्टावधानी व्यक्तित्त्व असल्याचे डॉ. चांदे यांनी सांगितले.
सद्‌गुरुदास महाराज यांनी वासुदेव चोरघडे हे ज्ञानोत्तरी भक्ती साधलेले ज्ञानसाधू असल्याचे गौरवोद्गार काढले. विद्याधनाचे स्वामी म्हणून ते पूज्य झाले. त्यांच्या स्मृतिदिनी निवेदकांचा सत्कार करणे हा अनोखा आणि स्तुत्य कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. पंडित राजेश्‍वर शास्त्री यांनी वासुदेव चोरघडे यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला. आभार प्रदर्शन ममता पत्तरकिने यांनी केले. या सोहळ्यादरम्यान चोरघडे कुटुंबीयांतर्फे नूतन भारत विद्यालयाला अभ्यासिकेसाठी निधी अर्पण करण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gyanasadhu Vasudev Chorghde Panchamurthy personality