हल्दीरामच्या मालकाचे अपहरण करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

नागपूर - आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या ‘हल्दीराम’च्या मालकाला दोन महिन्यांपासून ५० लाखांची खंडणी मागणे तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात अखेर धंतोली पोलिसांना यश आले. टोळीतील एक आरोपी फरार असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड माजी ड्रायव्हरच असल्याचे उघडकीस आले आहे. 

नागपूर - आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड असलेल्या ‘हल्दीराम’च्या मालकाला दोन महिन्यांपासून ५० लाखांची खंडणी मागणे तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच कुख्यात गुन्हेगारांना अटक करण्यात अखेर धंतोली पोलिसांना यश आले. टोळीतील एक आरोपी फरार असून या प्रकरणाचा मास्टरमाइंड माजी ड्रायव्हरच असल्याचे उघडकीस आले आहे. 

हल्दीरामचे मालक राजेंद्र शिवकिशन अग्रवाल (वय ५५, रा. वर्धमाननगर) दर शनिवारी लोहापुलाजवळील शनिमंदिरात दर्शनासाठी जातात. २७ एप्रिलला सकाळी अकरा वाजता दर्शनासाठी शनिमंदिरात गेले असता तेथे दबा धरून बसलेले आरोपी सौरव भीमराव चव्हाण (वय २१, रा. रामबाग), अतुल गोपाल पाटील (२४, रामबाग), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९, सोमवारी क्‍वॉर्टर्स, सक्‍करदरा), विनोद उमेश्‍वर गेडाम (वय २३, पाचनल, रामबाग) आणि श्‍याम बहाद्दूर सिंग (वय ५५, रा. हिवरीनगर) यांनी त्यांचा अपहरण करण्याचा कट रचला होता. मंदिरासमोर मिठाई वाटत असताना चार आरोपींनी राजेंद्र अग्रवाल यांना व्हॅनमध्ये कोंबण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरड झाल्यामुळे आरोपी व्हॅन घेऊन पळून गेले. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन तपास केला. मात्र, आरोपींचा पत्ता लागला नव्हता. यानंतर दोन महिने आरोपी शांत बसून होते. २८ जूनला पुन्हा मोबाईल आणि घरच्या फोनवर फोन केला. त्यांनी ५० लाखांची खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अग्रवाल यांनी धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांच्याकडे तक्रार दाखल दिली.

आरोपींची हुशारी
आरोपींनी धमकी देण्यासाठी एका मजुराचा मोबाईल चोरला. त्या दाम्पत्याचे रस्त्यावर गोळ्या-बिस्किटांचे दुकान आहे. त्या मोबाईलवरून ५० लाखांची खंडणी मागितली, तसेच वारंवार धमक्‍या दिल्या. पोलिसांनी लोकेशन आणि मोबाईल डाटा काढल्यानंतर मोबाईल मालकापर्यंत पोहोचले. त्यांनी मोबाईल चोरीला गेल्याचे सांगितले. 

असा लागला सुगावा
आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जुन्या नोकरांची यादी काढली. सोडून गेलेल्या नोकरांची चौकशी केली. त्यानंतर शनिमंदिराजवळ असलेल्या टॉवर लोकेशनमध्ये असलेले मोबाईल आणि अन्य मोबाईलशी तुलना करण्यात आली. त्यावरून मास्टरमाइंड श्‍याम सिंग याचे नाव समोर आले.

मोठा अनर्थ टळला
हल्दीराम कंपनीच्या मालकाचे केवळ अपहरणच नव्हे तर जीवही घ्यायला अपहरणकर्त्यांनी मागेपुढे पाहिले नसते. त्यामुळे कट यशस्वी झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. 

अपुन को पैसा प्यारा! 
ड्रायव्हर श्‍याम सिंगने मालकाच्या अपहरणाचा कट रचला. कुख्यात गुन्हेगार अतुल पाटील याच्या टोळीला प्लॅन सांगितला. झटपट ५० लाखांच्या कमाईसाठी टोळीने अपहरणाचा कट रचला. मात्र, दोन्ही प्रयत्न फसले. ‘अपुन को तो पैसा प्यारा’ अशी माहिती अतुलने पोलिसांना दिली. 

वचपा काढण्यासाठी डाव
श्‍याम सिंग हा १३ वर्षे राजेंद्र अग्रवाल यांच्या कारवर चालक म्हणून कार्यरत होता. त्याला घसघशीत पगारसुद्धा होता. मात्र, त्याला चोरी करण्याची सवय होती. तो बॅगेतील तसेच पर्समधील पैसे चोरत होता. दर आठवड्यात कारमधील डिझेलही विकत होता. हा प्रकार लक्षात आल्याने त्याला कामावरून कमी केले होते. कामावर पुन्हा घेण्याची तसेच कर्जाची मागणी तो करीत होता. 

Web Title: haldiram owner kidnapping plan crime