पाण्यासाठी मोथा गावात अर्धा किलोमीटर रांग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

अमरावती : सकाळ झाली की त्यांचा एकच ध्यास असतो, तो म्हणजे पाणी कसे मिळेल? जनावरांची, मुलाबाळांची तहान कशी भागविली जाईल. एक हंडा पाणी जरी मिळाले तरी दिवस सार्थकी लागला, अशी भावना मनात ठेवत चिखलदरा तालुक्‍यातील मोथा गावातील नागरिकांची प्रत्येक सकाळ पाण्यासाठी लागलेल्या रांगेत जाते. या रांगेत कोवळ्या चिमुकल्यांना कडेवर घेतलेल्या महिला तसेच थरथरणारी वृद्धमंडळी उभी असलेले दृष्य पहायला मिळते.

जिल्ह्यात यंदा भीषण पाणीटंचाई असून संपूर्ण जिल्ह्यात 65 गावांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखलदरा तालुक्‍यात 21 टॅंकर लावण्यात आले. चिखलदऱ्याचे प्रवेशद्वार असलेले मोथा हे गाव दुग्धजन्य पदार्थ जसे रबडी, खवा यासाठी प्रसिद्ध आहे. या गावात गवळी समाज मोठ्या संख्येने राहतात. पाण्याच्या टंचाईमुळे त्यांच्या व्यवसायावरसुद्धा परिणाम झाला आहे. माणसांनाच प्यायला पाणी नाही, तेथे जनावरांची तहान कशी भागवावी, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. सुमारे 700 लोकवस्तीच्या गावाची तहान सध्या टॅंकरवरच भागविली जाते.
गावात एकच मोठी विहीर असून त्यामध्ये टॅंकरने पाणी आणून टाकले जाते व नंबर प्रमाणे प्रत्येकाला दोन हंडे पाणी मिळते. मात्र त्यासाठी सकाळपासून गावातील महिला, चिमुकल्यांच्या रांगा लागतात. तळपत्या उन्हाची जराही पर्वा न करता दुपारी 11 वाजता येणाऱ्या टॅंकरची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. घाई गोंधळ होऊ नये यासाठी गावस्तरावर रांगेचा पर्याय देण्यात आला आहे. टॅंकरने विहिरीत पाणी सोडले की मग आपल्या नंबरप्रमाणे दोन हंडे पाणी एका कुटुंबाला देण्यात येते. एकप्रकारे पाण्याचे रेशनिंगच मोथा गावात केले जाते. चार दिवसांपूर्वी विहिरीतून पाणी काढताना एका चिमुकलीला प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे आता रांगा लावण्यात येतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Half a kilometer row in Motha village for water