Maharashtra Vidhansabha 2019 दिव्यांग कर्मचाऱ्यांना जुंपले कामात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नागपूर  : दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेऊ नये, अशा सूचना असतानाही जिल्ह्यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावर नियुक्‍त करण्यात आले. विशेष म्हणजे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडल्यावरही कामावर न आल्याने अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.

नागपूर  : दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामात घेऊ नये, अशा सूचना असतानाही जिल्ह्यातील अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांना कामावर नियुक्‍त करण्यात आले. विशेष म्हणजे, दिव्यांगाचे प्रमाणपत्र जोडल्यावरही कामावर न आल्याने अनेकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.
विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या कामाकरिता जवळपास 27 हजार कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. यासाठी सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सर्वाधिक संख्या शिक्षकांची असल्याचे सांगण्यात येते. निवडणुकीच्या कामात निवृत्ती सहा महिने असलेले अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग तसेच आजारींना ड्यूटीवर लावता कामा नये, अशा सूचना निवडणूक विभागाच्या आहेत. असे असतानाही दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर लावण्याचा प्रताप विभागाने केला आहे. कामावरील नियुक्तिपत्र आल्याने अनेकांनी यातून सूट मिळण्यासाठी विभागाकडे अर्ज केला. प्रमाणपत्रही जोडले. असे असताना अनेकांना दुसऱ्या प्रशिक्षणासाठी पत्र आले असून, पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी गैरहजर राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महिलांना दूर, अवघड क्षेत्र न देण्याच्या सूचनाही आहेत. यानंतरही महिला कर्मचाऱ्यांना दूरवरील केंद्र देण्यात आले आहे. यावर शिक्षकांनी आक्षेप घेतला आहे.
दिव्यांगांना नियुक्ती देऊ नये व महिलांना दूरच्या व अडचणीच्या ठिकाणी नियुक्ती न देण्याबाबत आधीच निवेदन देण्यात आले. दिव्यांग शिक्षकांना अनुपस्थित असल्याने कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली. हे योग्य नाही. प्रशासनाकडून आयोगाच्या सूचनाचे योग्यरीत्या पालन होताना दिसत नाही.
-धनराज बोडे, अध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Handicapping employees with disabilities