एकाकडून उद्घाटन, तर दुसऱ्याचे हारतुरे! 'अमृत' शुभारंभावरून भाजपमध्ये गटबाजी?

hansraj ahir disappointed in amrut scheme inauguration program in chandrapur
hansraj ahir disappointed in amrut scheme inauguration program in chandrapur

चंद्रपूर : शहरातील अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असतानाच दोन दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक एकमध्ये माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. मात्र, हा  कार्यक्रम मुनगंटीवार केंद्रित राहील, याची खबरदारी आयोजक नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे नाराज अहिरांनी काही नगरसेवकांना एकत्र करीत मनपा पदाधिकारी, नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम उरकला. विशेष म्हणजे, ही योजना राज्य शासन किंवा मनपाची नसून, केंद्र सरकारची असल्याचे अहीर यांनी सांगत पक्षांतर्गत विरोधकांचा समाचार घेतला.

केंद्र सरकारच्या माध्यमातून अमृत योजना राबविली जात आहे. या योजनेसाठी चंद्रपूर शहराची निवड करण्यात आली. यावेळी केंद्रात हंसराज अहीर, तर राज्यात सुधीर मुनगंटीवार मंत्री होते. सुमारे अडीचशे ते तीनशे कोटीहून अधिकच्या निधीत केंद्र सरकार, राज्य शासन आणि मनपाचा हिस्सा आहे. केंद्र सरकारकडून निधी आणण्यात अहिरांनी, तर राज्य शासनाकडून निधी आणण्यात मुनगंटीवारांचा मोठा वाटा राहिला आहे. मनपात भाजपची सत्ता असल्याने पदाधिकाऱ्यांनासुद्धा योजनेच्या वाट्यातील निधीसाठी फारशी धावपळ करावी लागली नाही. अमृतच्या कंत्राटदाराने नवीन टाकीचे बांधकाम केले. संपूर्ण शहरात पाइपलाइनचे जाळे विणले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यात कंत्राटदाराला अपयश आले. त्यामुळे आतापर्यंत दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता ही योजना अंतिम टप्प्यात आहे. पुढीलवर्षी महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे ही योजना तातडीने पूर्ण करून आपली पाठ थोपटून घेण्यासाठी पदाधिकारी उतावीळ झाले आहेत. अशात प्रभाग क्रमांक एकमध्ये या योजनेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही हौशी नगरसेवकांनी या योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्‌घाटक म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार, तर अध्यक्षस्थानी हंसराज अहीर होते. दिव्यांची रोषणाई, आतषबाजी आयोजकांनी केली. मात्र, हा सर्व कार्यक्रम मुनगंटीवार केंद्रित राहील, याची काळजी घेतली. त्यामुळे अहीर यांच्या वाट्याला आतषबाजी, रोषणाई नव्हती. 

केंद्र सरकार, राज्य शासन आणि मनपाचा निधी असल्याने शुभारंभाचा कार्यक्रम सर्वसमावेश राहील, अशी अपेक्षा अहीरांना होती. मात्र, आयोजकांनी अहिरांची ही अपेक्षा धुळीस मिळविली. त्यामुळे नाराज अहीरांनी आपल्या गटातील एका नगरसेवकामार्फत पक्षांतर्गत नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. फोनाफोनी झाल्यानंतर मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. अमृत योजनेचा शुभारंभ झालेल्या फलकाजवळ अहीर यांनी सर्वांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, ही योजना कुण्या एकट्याची नसून, केंद्र, राज्य आणि मनपाची असल्याचे सांगत पक्षांतर्गत विरोधकांचे कान धरले. त्यामुळे अमृतच्या शुभारंभापासून भाजपत गटबाजीचे विष पुन्हा पेरल्याची चर्चा नगरसेवकांत आहे.

देशमुखांची उपस्थिती, कासनगोट्टूवारांची अनुपस्थिती -
अमृत योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवारांचा मोठा वाटा आहे. महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांचे कासनगोट्टूवारांना मोठे पाठबळ होते. स्थायी समिती निवडणुकीवरून भाजपचे गटनेता वसंता देशमुख पक्षश्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला ते स्वत: अनुपस्थित होते की आयोजकांनी त्यांना हेतुपुरस्सर डावलले, याबाबत खुद्द भाजप नगरसेवकांत तर्कवितर्क लावले जात आहेत. अशात अहीरांनी आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमाला मात्र देशमुखांनी आवर्जून हजेरी लावली. शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजक असलेले कासनगोट्टूवार यांनी अहीरांच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शविली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com