शंकराचार्यांचा 'हम दो हमारे दस'चा नारा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नोटाबंदीप्रमाणे गोहत्याबंदी हवी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रातोरात नोटाबंदीचा निर्णय घेतला. तसेच आता गोहत्याबंदीचा कायदा आणायला हवा, अशी भूमिका सर्व साधू-संत आणि शंकराचार्यांनी व्यक्त केली. याशिवाय, राममंदिर बांधण्यात यावे, समान नागरी कायदा अस्तित्वात यावा; तसेच भारताला हिंदूराष्ट्र घोषित करण्याची मागणी करण्यात आली. भारताचा धर्म आणि भाषा घोषित करण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगत संस्कृतला सर्वोच्च स्थान देण्याबाबत सरकारने निर्णय घेण्याची आग्रही भूमिका महाकुंभात व्यक्‍त झाली.

नागपूर - हिंदूच्या घटत्या लोकसंख्येवर "हम दो हमारे दस' असा उपाय रविवारी (ता. 25) जोतिषपीठाधीश्‍वर शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी सुचविला. हिंदू अल्पसंख्य होतोय, असे सांगत प्रत्येकाने किमान दहा अपत्यांना जन्म देण्याचा सल्ला देताना शास्त्रानुसार दहा नरकांपासून सुटका करायची असेल, तर दहा अपत्ये असायलाच हवीत; अन्यथा भारत हिंदूराष्ट्र कसे होईल, असा सवाल त्यांनी केला.

देवनगरी (रेशीमबाग मैदान) येथे आयोजित धर्म-संस्कृती महाकुंभाचा रविवारी समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती, काशी पीठाधीश नरेंदानंद सरस्वती, हंपी पीठाधीश विद्यानंद भारती, युधिष्ठीरलाल महाराज, नानीज पीठाधीश नरेंद्राचार्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, विहिंपचे डॉ. प्रवीण तोगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदू आणि त्यांच्या सणांवर होत असलेली आक्रमणे अशीच सुरू राहिली, तर पिंडदानाची प्रथा लोप पावेल, अशी भीती व्यक्त करत हिंदूराष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंदूंचा टक्का वाढायलाच हवा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

तत्पूर्वी डॉ. तोगडिया यांनी जोपर्यंत गोहत्या बंदी, शाळांमध्ये वेदांचे अध्ययन आणि राममंदिर होणार नाही तोपर्यंत भारतातील हिंदूंचे समाधान होणार नाही, असे सांगितले. हिंदूंच्या सणातील लाउडस्पीकर खटकणाऱ्यांना पहाटेची ओरड दिसत नाही. हिंदूंचे केंद्र असलेल्या भारतातील हिंदू बंधनात आहेत. तीन कोटी बांगलादेशी भारतात येऊन स्थायिक होत असताना कुणी याविरुद्ध "ब्र'देखील काढत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. नरेंदानंद सरस्वती यांनी हिंदू संघटित नसल्यामुळेच देशाचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. समान नागरी कायदा, गोहत्या बंदी यासाठी संघाने सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

118 कोटी हनुमान चालिसा
महाकुंभाच्या समारोपीय सोहळ्यानंतर 118 कोटी हनुमान चालिसा पठणाला पूर्णाहुती देण्यात आली. तीन दिवस चाललेल्या या महाकुंभात विविध अनुष्ठान करण्यात आले. याचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यानंतर 3 लाख 25 हजार रुद्राक्षांनी बनलेल्या शिवलिंगातील रुद्राक्षाचे उपस्थितांमध्ये वाटप करण्यात आले. समारोपानंतर नगर परिक्रमा करण्यात आली.

पोलिसांनी घेतला पर्वणीचा लाभ
त्रिदिवसीय धर्म-संस्कृती महाकुंभ आणि राष्ट्रीय वेद संमेलनादरम्यान रेशीमबाग मैदान तसेच संपूर्ण परिसरात भाविकांची मांदियाळी होती. या सर्वांचे दळणवळण, नगर परिक्रमेदरम्यान संपूर्ण मार्गावर करण्यात आलेली सुरक्षाव्यवस्था तसेच संमेलनस्थळी भाविकांची पोलिसांनी घेतलेली काळजी लक्ष वेधून घेणार ठरली. एरवी प्रचंड तणावात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या आध्यात्मिक पर्वणीचा लाभ घेतला.

रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद
महाकुंभासाठी आलेल्या भाविकांची सोय तब्बल 25 शाळा आणि मंगल कार्यालयांमध्ये केली होती. 50 हजार भाविकांनी महाकुंभाला हजेरी लावल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला. समारोपानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद वाटप सुरू होते. यात बाहेरगावाहून आलेल्यांसह स्थानिकांनीदेखील सहभाग नोंदविला.

Web Title: Have 10 kids, god will take care of them, seer tells Hindus