हवालातील आरोपींसह पोलिस शहरात दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

नागपूर - हवालाची रक्कम जप्त होण्यापूर्वीच तब्बल अडीच कोटींची रक्कम टिप देणाऱ्यांनीच लंपास केली होती. उपराजधानीसह राज्याच्या पोलिस दलात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींसह पोलिस पथक आज शहरात दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांकडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून आश्‍चर्यकारक माहिती पुढे आल्याचे सांगण्यात येते. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. या विषयावर कोणतेही भाष्य करणे टाळले जात आहे. 

रवी माचेकर, सचिन पडगीलवार, पिंटू वासनिक व गजानन मुनमुने अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना महाबळेश्‍वर येथून अटक  करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार डस्टरमधून अडीच कोटींची रोख लंपास केल्यानंतर प्रकरणातील मास्टरमाइंडने संपूर्ण रक्कम स्वत:कडे ठेवून घेतली. दुसरीकडे चारही आरोपींना पाच पाच लाख रुपये देत त्यांना नागपूरपासून लांब राहण्याची ताकीद देण्यात आली होती. आरोपी गोव्याला जाणार होते. पण, रात्र झाल्याने ते महाबळेश्‍वरला थांबले. वाटेत त्यांनी दीड लाखाची खरेदीही केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे तीन लाख रुपये हस्तगत केले. 

नंदनवन पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री प्रजापती चौकात डस्टर कारला अडवून सव्वातीन कोटींची रोख रक्कम जप्त केली होती. रायपूरच्या सराफा व्यापाऱ्याने नागपुरातील खंडेलवाल नामक व्यावसायिकाला देण्यासाठी ही रक्कम पाठविल्याचा दावा केला जात आहे. रकमेसह पोलिसांनी कारचालक राजेश मेंढे (४०) रा. मिनीमातानगर आणि नवनीत जैन (२९) रा. तुळशीनगर यांना अटक केली होती. या घटनेसाठी नंदनवन पोलिस पाठ थोपटून घेत असतानाच पोलिसांच्या देखरेखीत टिप देणाऱ्यांनीच अडीच कोटींची रोख पळविल्याचे पुढे आले. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. 

लवकरच अन्य आरोपीही गजाआड 
नंदनवन ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हवालाची रक्कम लंपास केल्यासंदर्भातील धागेदोरे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाती लागू लागले असल्याची माहिती आहे. लवकरच या प्रकरणातील अन्य आरोपीही गजाआड होतील, असा दावा पोलिस अधिकाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर करण्यात येत आहे. दुसरीकडे टिप देणाऱ्यांनी झटापट करीत रक्कम लांबविल्याचा दावा संयशाची सुई असलेल्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत असल्याची माहितीसुद्धा पुढे येत आहे.

Web Title: hawala money accused police

टॅग्स