जुगारासाठी तो झाला खुनी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

- पैशाच्या वादात मित्राचाच काढला काटा 
- जुगाराचा छंद ठरला खुनाचे कारण 
- घटनेमुळे परिसरात एकच खळबळ 

वणी (जि. यवतमाळ) : उसनवारी दिलेले पैसे परत मागत असल्याने मित्राला रूमवर बोलावून गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वणी शहरात उघडकीस आली. तपासाची चक्रे वेगात फिरवून पोलिसांनी मारेकऱ्यास नागपुरातून बेड्या ठोकल्या. 

सतीश देवासे (28, रा. तुकूम, जि. चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे. तर, करण कश्‍यप (25, रा. आर्वी) असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. जुगाराचा छंद माणसाला कसे खुनी बनवू शकते, याचे ही घटना एक उदाहरण आहे. करण हा वणी येथील एका खासगी फायनान्स कंपनीत कामाला होता. जुगाराचा छंद जडल्याने त्याच्या डोक्‍यावर कर्जाचे ओझे वाढले. त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सतीश देवासेकडून उसनवारीने साठ हजार रुपये घेतले होते. 

सतीशने काही दिवसांपासून उसनवार दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी तगादा लावला. करण पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने सतीश रविवारी (ता. तीन) करण किरायाने राहत असलेल्या रवीनगर येथील खोलीवर आला. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोरीच्या साहाय्याने तरुणाने सतीशचा गळा आवळून खून केला. मृतदेह पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याची योजना करणने आखली. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. दोन दिवस मृतदेह खोलीतच राहिल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली.

मंगळवारी खोलीला कुलूप लावून करणने पोबारा केला. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालक अनिल आसुटकर यांना संशय आला. त्यांनी तत्काळ वणी पोलिस ठाणे गाठून ठाणेदार वैभव जाधव यांना माहिती दिली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मात्र, अवघ्या काही तासांतच संशयितास अटक करण्यात आली. ही कारवाई एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन वानोडे, शेखर वांढरे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे अमित पोयाम, दीपक वांडसवार यांनी केली. 

मोबाइल लोकेशनमुळे अडकला 
पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवून करणच्या मोबाईलचे लोकेशन काढले. तो नागपूरच्या दिशेने जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. काजीपुरा येथे संशयित करणचा मामा राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून नागपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून मंगळवारी रात्री अकराला करण त्याच्या मामाच्या घरी येताच बेड्‌या ठोकल्या. 

तीनही घटनांचा छडा लावण्यात यश 
वणी येथे गेल्या महिनाभरात तीन खुनांच्या घटना घडल्याने खळबळ उडाली. या तीनही प्रकरणांत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवून अवघ्या काही तासांतच मारेर्कयांना गजाआड करण्यात यश मिळविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He became a murderer for gambling