बारा बोअर बंदुकीसह तो आला गावात; पोलिसांनी केली अटक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

वहानगाव येथे कमलसिंग अंधरेले राहतात. त्यांच्याकडे जगदिपसिंग छोटुसिंग भोंड हे गेल्या काही दिवसांपासून राहत होते. त्यांच्याजवळ एक बंदूक असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली होती.

चिमूर (जि. चंद्रपूर)  : चिमूर तालुक्‍यात येत असलेल्या वहानगाव येथील एका व्यक्तीला पोलिसांनी बारा बोअरच्या बंदुकीसह अटक केली. जगदिपसिंग छोटुसिंग भोंड (वय 38) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई शेगाव पोलिसांनी रविवारी (ता. 21) केली. 

वहानगाव येथे कमलसिंग अंधरेले राहतात. त्यांच्याकडे जगदिपसिंग छोटुसिंग भोंड हे गेल्या काही दिवसांपासून राहत होते. त्यांच्याजवळ एक बंदूक असल्याची माहिती शेगाव पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे शेगाव पोलिसांनी रविवारी त्याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांना मिळालेली माहिती खरी ठरली. जगदिपसिंग छोटुसिंग भोंड याच्याकडे खरोखरच बारा बोअरची बंदूक आढळली.

अवश्य वाचा- `फादर्स डे`ला मुलाने वडिलांना दिली अनोखी भेट; असे पूर्ण केले स्वप्न

पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी जगदिपसिंग भोंड याच्याकडे त्या बंदुकीचा कुठलाही परवाना नव्हता. तसेच ही बंदुक तुझ्याकडे कशी आली या पोलिसांनी विचारलेल्या प्रश्‍नाला जगदिपसिंग व्यवस्थित उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला बंदुकीसह ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोरेश्‍वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, फौजदार क्षीरसागर, चौधरी, आमने यांनी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He came to the village with twelve bore guns; Police arrest him