मुख्याध्यापक, शिक्षिका निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नागपूर : विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवणारे मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षिकेवर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
पंचायत समिती मौदाअंतर्गत येणाऱ्या धानला जि. प. प्राथमिक शाळेतील इयत्ता 5 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती व नवोदय स्पर्धा परीक्षेकरिता शुल्काची आकारणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून 50 ते 80 रुपये अतिरिक्त घेतले होते. पैसे घेतल्यावरही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळाले नाही. यामुळे येथील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. स्थायी समितीतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. मुख्याध्यापक सुरेश भोयर आणि सहायक शिक्षिका सरिता जयपूरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यामार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मासिक, वार्षिक नियोजन तयार न करणे, शैक्षणिक वर्षात 48 तासिका पूर्ण न करणे, शालेय पोषण आहाराची माहिती अद्ययावत न ठेवणे, विद्यार्थी हजेरीचा गोषवारा अद्ययावत न ठेवणे, त्यांची नोंद नोंदवहीत न घेणे व मुख्यालयी न राहणे आदी बाबतीत शिक्षण विभागाने केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आल्या. विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्यामुळे पालकांचा तथा गावकऱ्यांना जयपूरकर यांच्यावर प्रचंड रोष होता. कार्यालयीन कर्तव्यात कसूर केल्याचे विभागीय चौकशीत निदर्शनास आले. शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी मुख्याध्यापक सुरेश भोयर व सहायक शिक्षिका सरिता जयपूरकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला होता. महिनाभर झाल्यावरही अमल झाला नाही. स्थायी समितीचे आदेश प्रशासन धुडकावत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित केले. त्यानंतर प्रभारी सीईओ अंकुश केदार यांनी सामान्य प्रशासन विभागाकडून फाइल मागवून घेत निलंबनाचे आदेश काढले.

Web Title: Headmaster, teacher suspended