मुख्याध्यापकजी, हे काय केलं तुम्ही?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

नागपूर : शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात दोन डझन नोटबुक स्वीकारणाऱ्या मनपा शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी शाळा परिसरातच सापळा रचून ही कारवाई केली. 

नागपूर : शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात दोन डझन नोटबुक स्वीकारणाऱ्या मनपा शाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी शाळा परिसरातच सापळा रचून ही कारवाई केली. 
श्‍यामसुंदर गोहोकर (52) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे. ते जुना सुभेदार ले-आउट येथील मनपाच्या दुर्गानगर माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. या प्रकरणातील तक्रारकर्ते मानेवाडा जुनी वस्ती येथील रहिवासी असून नोकरी करतात. त्यांची बहीण मानेवाडा गावात राहते. 2000 साली मुसळधार पावसामुळे गावातील नाल्याला पूर येऊन घरात पाणी शिरले होते. यामुळे कागदपत्रांचे नुकसान झाले होते. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी बहिणीला शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची गरज होती. तक्रारदाराने बहिणीच्या नावाने ऍफिडेव्हिट करून टीसी मिळण्यासाठी शाळेकडे अर्ज केला होता. मुख्याध्यापक गोहोकर यांनी टीसी देण्याची तयारी दर्शवीत दोन डझन नोटबुकची मागणी केली. तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाऊन तक्रार दिली. 
पोलिस निरीक्षक पंकज उकंडे यांनी तक्रारीची शहानिशा केली. शुक्रवारी सापळा दुपारी शाळा परिसरात सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ते प्रत्येकी 200 पानांचे दोन डझन नोटबुक घेऊन पोहचले. गोहोकर यांनी नोटबुक स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. गोहोकर यांच्याविरुद्ध हुडकेश्‍वर ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. मनपा शाळेत प्रामुख्याने गरीब कुटुंबातील विद्यार्थी असतात. त्यांच्या सुविधेसाठी गोहोकर यांनी नोटबुकची मागणी केल्याचा शिक्षकांचा दावा आहे. गोहोकर यांची भावना चांगली असली तरी कुणाला अटकाव करून वस्तूची मागणीसुद्धा कायद्यात लाचच ठरते. या कारवाईनंतर गोहोकर यांच्या निवास्थानाचीही झडती घेण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Headmaster, what have you done?