आरोग्य विभाग खोटारडा

file photo
file photo


यवतमाळ : चार दिवसांपासून शहरातील कचरा गोळा करणारी वाहने बंद आहेत. यावर प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. परिणामी, शहरात अस्वच्छता दिसत असून शहरात ठिकठिकाणी कचराकोंडी झाल्याने नगरसेवक प्रशासनावर चांगलेच संतापले. शिवाय, आरोग्य विभागातील कर्मचारी सांगितलेली कामे करीत नसून केवळ खोटारडेपणा करीत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ नगरसेवक उद्धवराव साबळे यांनी केला.
नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेत 31 मे रोजीची स्थगित झालेली सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. 15) घेण्यात आली. नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढले. चार दिवसांपासून शहरातील घंटागाडी बंद असतानाही प्रशासनाने कोणताही तोडगा काढला नाही. कचऱ्याचे कंत्राट दिलेले कंत्राटदार काय काम करतात, याची माहिती अधिकाऱ्यांना नाही. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतरही शहरातील कचऱ्यांचा प्रश्‍न कायम आहे. आता घंटागाडी बंद असल्याने त्यात अधिक भर पडली आहे. अनेक ठिकाणी कचराकोंडी झाली असून नागरिकांची ओरड असल्याचा आरोप नगरसेवक प्रा. बबलू देशमुख, चंदू चौधरी यांनी केला. पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी याच कामी असणे आवश्‍यक असल्याने त्यांना इतर कुठल्याही विभागाचे काम देण्यात येऊ नये, अशी मागणी दर्शना इंगोले यांनी केली. नगरसेवक प्रा. डॉ. अमोल देशमुख, बांधकाम सभापती विजय खडसे, कीर्ती राऊत, शुभांगी हातगावकर, सुषमा राऊत यांनीही आरोग्य विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. यावेळी मुख्याधिकारी अनिलकुमार अढागळे उपस्थित होते.

कचरा कंत्राट चौकशीच्या फेऱ्यात
स्वच्छ भारत अभियान घनकचरा व्यवस्थापनाच्यादृष्टीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता कंत्राटाबाबतच्या निविदा प्रक्रिया, प्रशासनाने दिलेल्या कार्यादेशाची चौकशी करण्याची मागणी नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी पालिका प्रशासन विभागाच्या आयुक्ताकडे केली होती. कचऱ्याचे कंत्राट विभागून देण्यात येऊ नये, अशी लेखी सूचना दिली असतानाही आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, नियोजन सभापती भानुदास राजने यांनी विभागून काम देणाऱ्या करारनाम्यावर स्वाक्षरी केल्या आहेत. त्यामुळे ही प्रकिया बेकायदेशीर असल्याचा आरोप नगराध्यक्ष चौधरी यांनी तक्रारीत केली आहे. त्यानंतर प्रादेशिक उपसंचालकांनी निविदा प्रक्रियेबाबत चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता अनेक गौडबंगाल बाहेर येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com