भंडारा जिल्ह्यात आरोग्यसेवा ‘व्हेंटिलेटर’वर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

वर्ग एकची चार व वैद्यकीय अधिकाऱ्यांची अकरा पदे रिक्त 
भंडारा - सर्व सोयींनी युक्त आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या पालक जिल्ह्यातीलच आरोग्यसेवा ‘व्हेंटिलेटर’वर आहे. मागील वर्षभरापासून वर्ग एकच्या चार पदांसह ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर, अनेक रुग्णालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. उपचार मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे. 

वर्ग एकची चार व वैद्यकीय अधिकाऱ्यांची अकरा पदे रिक्त 
भंडारा - सर्व सोयींनी युक्त आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या पालक जिल्ह्यातीलच आरोग्यसेवा ‘व्हेंटिलेटर’वर आहे. मागील वर्षभरापासून वर्ग एकच्या चार पदांसह ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर, अनेक रुग्णालयांमध्ये सोयीसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. उपचार मिळत नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागत आहे. 

राज्यात भाजप-युतीची सत्ता आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवसेनेच्या वाट्याला गेले. ज्येष्ठ व अनुभवी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची पालकमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यांच्या नियुक्तीनंतर जिल्ह्याच्या आरोग्यसेवेला बळ मिळेल, अशी आशा असताना उलटेच चित्र निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत रिक्त पदांचा खेळखंडोबा संपला नाही. येथील जिल्हा आरोग्य अधिकारी पदासह सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी चार पद रिक्त आहेत. तसेच ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने आरोग्यसेवा सलाईनवर आहे. अनेकदा रिक्त पदे भरण्याची मागणी करूनही याकडे आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. 

सध्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार डॉ. उके यांच्याकडे असून, त्यांच्याकडे जिल्हा प्रशिक्षण केंद्राचा प्रभार आहे. तसेच रिक्त असलेल्या सहायक आरोग्य अधिकारीपदाचा प्रभार आहे. यामुळे एकच अधिकाऱ्याच्या भरवशावर आरोग्यसेवेचा डोलारा सुरू आहे. याशिवाय मागील अनेक दिवसांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. 

डॉ. सावंत यांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर रिक्त पदे त्वरित भरण्याची ग्वाही जिल्हावासींना दिली होती. मात्र, आजवर पदे भरण्यात आली नाहीत. उलट, रिक्त नसलेले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याचे पद रिक्त झाले.
 

महिला रुग्णालयाचे भिजत घोंगडे 
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मंजूर स्वतंत्र महिला रुग्णालयाचा प्रश्‍न अद्यापही निकाली निघाला नाही. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मागील दीड वर्षापूर्वी महिला रुग्णालयाचा प्रश्‍न त्वरित मार्गी लागेल, असे आश्‍वासन दिले होते. त्यांनी प्रस्तावित जागेची पाहणीही केली होती. मात्र, आजवर साधे भूमिपूजनही झाले नाही. पालकमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्यानंतर महिला रुग्णालयाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांतील चढाओढ झाली. शिवसेनेने स्वाक्षरी मोहीम राबविली. परंतु, महिला रुग्णालयाचे भिजत घोंगडे असल्याने श्रेयवाद राजकीय पक्षांच्या अंगलट आला, हे विशेष. 

लोकप्रतिनिधींची उदासीनता 
जिल्ह्यातील नागरिकांना सर्वसोयीयुक्त आरोग्यसेवा मिळावी, यासाठी रिक्त पदे भरावी, यादृष्टीने स्थानिक लोकप्रतिनिधी शासनस्तरावर पाठपुरावा करीत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री दौऱ्यावर असताना केवळ लोकप्रतिनिधी रिक्त पदांचा प्रश्‍न उपस्थित करतात. मात्र, त्यानंतर साधे पाठपुरावाही करीत नाही.

Web Title: health service on ventilator in bhandara district