कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी आरोग्य कर्मचारी करणार घरोघरी सर्व्हे

मिलिंद उमरे
Wednesday, 23 September 2020

जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांची कोरोनाबाबत तपासणी करण्याकरिता सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत गृहभेटींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यास मदत होत असून त्यांना वेळीच उपचार मिळाल्यास कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे.

गडचिरोली : अनेकजण कोरोनाची लक्षणे असूनही कधी योग्य माहिती नसल्याने, तर कधी भीतीपोटी चाचणी करीत नाहीत. त्यामुळे बऱ्याचदा पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्यास तो धोकादायक पातळीवर असण्याची शक्‍यता असते. त्यामुळे सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे.

 

आरोग्य कर्मचारी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पूर्वनिदानाला मदत मिळत असून या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

 

जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांची कोरोनाबाबत तपासणी करण्याकरिता सुरू झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेअंतर्गत गृहभेटींना सुरुवात झाली आहे. याबाबत गावस्तरावर तसेच शहरातील विविध ठिकाणी प्रत्यक्ष पथकांनी गृहभेटी देण्यास सुरुवात केली आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झाले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्‍य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद
यांनी केले आहे.

जाणून घ्या : अचानक कानठळ्या बसविणाऱ्या बंदुकीच्या आवाजाने उडाला उमरेडकरांचा थरकाप

प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद म्हणाले, स्वयंशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो. कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होऊच नये, यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

संशयित रुग्ण शोधण्यास मदत

दरम्यान या मोहिमेअंतर्गत गृहभेटी देऊन थर्मोगनद्वारे नागरिकांचे शरीराचे तापमान तपासणे, ऑक्‍सिमिटरद्वारे ऑक्‍सिजनची पातळी तपासणे व इतर तपासण्यात करण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यास मदत होत असून त्यांना वेळीच उपचार मिळाल्यास कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे.

अवश्य वाचा : सुदृढ प्रकृतीमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, आता या भ्रमात राहू नका

आजपासून जनता कर्फ्यू

जिल्ह्यातील वाढते कोरोना रुग्ण व मृत्यूंमध्ये झालेली वाढ लक्षात घेत नगर पालिका, व्यापारी संघटना व सर्वपक्षीयांकडून 23 ते 30 सप्टेंबरदरम्यान जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. या एक आठवड्याच्या जनता कर्फ्यूच्या कालावधीत रुग्णालये, मेडीकलची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नागरिकांनी जनता कर्फ्यूला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health workers will conduct a survey to find suspected patients of corona