सव्वा लाख शेतकऱ्यांच्या अर्जांचा ढीग 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

यवतमाळ : अवकाळी पावसाने खरिपातील पिकांच्या नुकसानाचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत एक लाख 21 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातील सात हजार अर्जांवर पंचनामे झाले असून शेतशिवारातील चिखलाने पंचनाम्याची गती मंदावली आहे. 

यवतमाळ : अवकाळी पावसाने खरिपातील पिकांच्या नुकसानाचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत एक लाख 21 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातील सात हजार अर्जांवर पंचनामे झाले असून शेतशिवारातील चिखलाने पंचनाम्याची गती मंदावली आहे. 
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कबंरडे मोडले आहे. नुकसानाचा आकडा दिवसागणीक फुगत आहे. आतापर्यंत तो अडीच लाख हेक्‍टरवर गेला असून अजूनही वाढण्याची शक्‍यता आहे. नेमके किती नुकसान झाले यांची पाहणी प्रशासनाकडून केली जात आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. आतापर्यंत एक लाख 21 हजार 198 शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केले आहेत. यातील सहा हजार 918 शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत. त्यांच्या नुकसानीचा आकडा 18 कोटी 17 लाख 97 हजार रुपयांच्या घरात आहे. जसे पंचनामे पूर्ण होतील तसा हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत पुसद, दिग्रस, उमरखेड तसेच महागाव या चार तालुक्‍यांतून सर्वाधिक 71 हजार 674 शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. यवतमाळ, कळंब, राळेगाव तसेच घाटंजी या चार तालुक्‍यांतून पाच हजार 171 अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज देण्यासाठी अजूनही शेतकरी रांगेत असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. अर्ज दाखल झालेल्या संख्येच्या तुलनेत पंचनाम्यांची गती मंदावली आहे. अनेक अडचणी तसेच शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याची कारणे समोर येत आहे. यामुळे पंचनामे पूर्ण करण्यासाठी आणखी आठ दिवस लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
 
शेतकरी आर्थिक संकटात 
संपूर्ण विदर्भातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून अद्यापही कोणतीही मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त करण्यात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. परंतु, ते संथगतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे. शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणीही पुढे होत आहे. 

तालुका-अर्जांची संख्या 
यवतमाळ-899 
कळंब-1367 
राळेगाव-716 
घाटंजी-2189 
दारव्हा-10725 
नेर-7310 
आर्णी-10820 
बाभूळगाव-4445 
पुसद-26485 
दिग्रस-11735 
उमरखेड-22884 
महागाव-10570 
पांढरकवडा-7495 
वणी-565 
झरी-2494 
मारेगाव-499 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heaps of applications for all one million farmers