सोनेगाव तलावप्रकरणी सुनावणी तहकूब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण-पश्‍चिम भाजपतर्फे ऐतिहासिक वारसा असलेल्या सोनेगाव तलाव येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या तलावाच्या स्वच्छतेसाठी भाजपने परवानगी घेतली आहे का? याबाबत सरकार उत्तर देण्यात अपयशी ठरल्यामुळे बुधवारी (ता. २४) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.  

नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्दन मून यांनी दाखल केलेल्या या रिट याचिकेनुसार ऐतिहासिक वारसा असलेल्या या तलावावर भाजपतर्फे ७ पोकलेन, ५ जेसीबी, ४० टिप्पर चालविण्यात येणार आहे. जवळपास आठवडाभर चालणाऱ्या या स्वच्छता अभियानामध्ये ५ हजार ट्रक गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. सोनेगाव तलाव ही सार्वजनिक संपत्ती असून स्वच्छता अभियान राबविण्यासाठी भाजप या राष्ट्रीय पक्षाने प्रशासनाची परवानगी घेणे आवश्‍यक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. याचिकाकर्त्याने बुधवारी न्यायमूर्ती अतुल चांदूरकर  यांच्यासमक्ष प्रकरण मांडले. गाळ उपसा तसेच स्वच्छता अभियान सुरू झालेले आहे. यामुळे तत्काळ अंतरिम स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली. त्यावर भाजपने प्रशासनाकडून परवानगी घेतली आहे का? याबाबत विचारणा करत माहिती घेण्यास सांगितले होते. मात्र, बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरकार उत्तर अपयशी ठरले. 

भाजपतर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारशाचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल याचिकाकर्त्याने उपस्थित केला आहे. पुढील सुनावणी २६ मे रोजी होणार आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे ॲड. अश्‍विन इंगोले यांनी बाजू मांडली.

Web Title: Hearing of the hearing of the Sonegaon lake