"दिल वालो की दिल्ली'ने दाखवली माणुसकी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

- धानल्यातून बेपत्ता झालेला प्रज्वल दिल्लीत विक्रेताला गवसला 
- रागाच्या भरात घरून निघून गेला होता 
- शोध घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर 

मौदा (जि. नागपूर) : प्रज्वल हा मौदा तालुक्‍यातील धानला येथे राहतो. तो भंडारा जिल्ह्यातील नानाजी जोशी महाविद्यालयात शिकतो. तो अकरावीचा विद्यार्थी आहे. वडिलांनी रागावले म्हणून त्याने घर सोडले. पालकांनी नातेवाईक, मित्र व परिचितांकडे शोध घेतला. मात्र, तो सापडल नाही. त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने सोशल मीडियावर संदेश टाकण्यात आले. तरीही तो सापडला नाही. मात्र, देशाची राजधानी दिल्लीत पोहोचल्यानंतर विक्रेताने माणुसकी दाखवित प्रज्वल सुखरूप असल्याची माहिती पालकांना दिली. 

मौदा तालुक्‍यातील धानला येथील रहिवासी प्रज्वल नंदू बागडे (वय 17) हा 31 ऑक्‍टोबरला सायंकाळच्या सुमारास अचानक घरून निघून गेला होता. त्याचे वडील नंदू यांचे मौदा येथे फेब्रिकेशन वेल्डिंगचे वर्कशॉप आहे. तो अचानक निघून गेल्यानंतर पालकांनी नातेवाईक, मित्र व परिचितांकडे शोध घेतला. मात्र, त्याची कोणतीही माहिती मिळत नसल्याने सोशल मीडियावरून शोध घेण्यासाठी संदेश टाकण्यात आले. 

शुक्रवारी मौदा ठाण्यात प्रज्वलचे अपहरण व बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. मौदा पोलिसांनीही प्रज्वलचा शोध सुरू केला. दुसरीकडे गुरुवारी घरून निघालेला प्रज्वल शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला. रात्रीच्या सुमारास दिल्लीच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील द्वारका बाजारपेठ परिसरात स्टेशनरी विक्रेते अष्टविनायक यांना प्रज्वल दिसला. त्याच्याकडून माहिती जाणून घेतली व पालकांना फोनवरून तो सुखरूप असल्याची माहिती दिली. पोलिसांनाही कळविण्यात आले. स्टेशनरी विक्रेते अष्टविनायक यांनी माणुसकी दाखविली म्हणून प्रज्वल सुखरूप घरी परतणार आहे. प्रज्वलचा शोध घेऊन निराश झालेल्या पालकांना निरोप मिळताच आनंद गगनात मावेनासा झाला. या प्रकरणाचा तपास मौदाचे ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात विजय सिंग ठाकूर करीत आहे. 

दिल्ली पाहून घाबरला प्रज्वल 
दिल्ली शहराच्या दक्षिण-पश्‍चिम भागातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या "द्वारिका' भागात प्रज्वल पोहोचला. दिल्लीची भव्यता पाहून तो घाबरला होता. या अवस्थेत प्रज्वल विक्रेते अष्टविनायक यांना दिसला. त्यांनी त्याला दुकानात बोलावले. तो घाबरलेला आहे, हे समजाताच त्याला धीर दिला. त्यास घरी घेऊन गेले. जेवण दिले व त्यानंतर विचारपूस केली. प्रज्वलने घरून निघून जाण्याचे कारणही सांगितले. सोबतच वडिलांचा फोन नंबरही दिला. अष्टविनायक यांनी नंदू बागडे यांना फोन करून प्रज्वल सुखरूप असल्याची माहिती दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The heart of Delhi has shown humanity