उपराजधानीत उष्माघाताचे शतक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

शहरात दोन दिवसांपासून वादळ वाऱ्यासह पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तापमानात घट झाली. ढगाळ वातावरण दिसत असून, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो

नागपूर - उपराजधानीचा पारा खाली आला आहे. मात्र, त्याआधी प्रचंड उकाडा असल्याने विविध खासगी रुग्णालयांत उष्माघाताच्या रुग्णसंख्येचे शतक पूर्ण झाले आहे. यावर उपचाराचा उतारा म्हणून महापालिकेने शहरातील तीन रुग्णालयांत 40 खाटांचे शीत वॉर्ड तयार केले आहे. मात्र, महापालिकेचे शीत वॉर्ड अद्याप रिकामेच आहेत. 

शहरात दोन दिवसांपासून वादळ वाऱ्यासह पावसाची नोंद झाली आहे. यामुळे तापमानात घट झाली. ढगाळ वातावरण दिसत असून, याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील पाचपावली सूतिकागृहात 10, गांधीनगर येथील इंदिरा रुग्णालयात 10 व आयसोलेशनमध्ये 20 अशा 40 खाटांचा शीत वॉर्ड तयार केला आहे. मात्र, या शीत वॉर्डात अद्याप उष्माघाताचे रुग्ण भरती झाले नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये मंगळवारपर्यंत उष्माघाताच्या 110 रुग्णांची नोंद झाली आहे. पाणपोईसह निवारे उभारले नसल्याने उष्माघाताच्या रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. 

स्वाइन फ्लू पोहोचला 325वर 
नागपूर विभागात स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभागाला अपयश आले आहे. स्वाइन फ्लू बाधितांची संख्या साडेतीन महिन्यांत 326 वर पोहोचली आहे. विभागात 24 जणांचा मृत्यू झाला. महापालिकेच्या हद्दीतील स्वाइन फ्लू बाधितांची संख्या 225 असून, यातील 14 जण दगावल्याची नोंद आहे. तरीही उपाययोजना करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.

Web Title: Heat stroke patients in private hospitals