विदर्भात उन्हाची तीव्र लाट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून, नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवले. मंगळवारी नागपूरच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ होऊन पारा या मोसमातील उचांकी 44.1 अंशांवर पोहोचला.

नागपूर - विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला असून, नागपूरसह जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचे तीव्र चटके जाणवले. मंगळवारी नागपूरच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ होऊन पारा या मोसमातील उचांकी 44.1 अंशांवर पोहोचला. नागपूरचे तापमान विदर्भात सर्वाधिक ठरले. उन्हाची लाट आणखी एक-दोन दिवस कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

राजस्थानकडून मध्य भारताकडे उष्ण वारे वाहात असल्यामुळे सध्या विदर्भ, मराठवाडा व मध्य प्रदेशात उन्हाची लाट पसरली आहे. लाटेचा सर्वाधिक फटका नागपूरकरांना बसला. चोविस तासांत नागपूरचे तापमान तब्बल 2.3 अंशांनी चढून 44.1 अंशांवर आले. यंदाच्या उन्हाळ्यातील हे उचांकी तापमान ठरले. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद नागपुरातच झाली. सूर्याचा प्रकोप वर्धा (43.2 अंश सेल्सिअस), अकोला (43.1 अंश सेल्सिअस) आणि ब्रह्मपुरी (43.0 अंश सेल्सिअस) या जिल्ह्यांमध्येही अधिक जाणवला. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये उन्हाचा प्रभाव दिसून आला. 

शहरात दुपारी दोनपर्यंत चांगलेच चटके जाणवले. त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळाला. अचानक ऊन वाढल्याने नागपूरकर चांगलेच घामाघुम झाले. सायंकाळपर्यंत उन्हाच्या झळा जाणवल्या. विदर्भातील उन्हाची लाट पुढील चोवीस तासांपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्‍यता आहे. 

पावसाचीही शक्‍यता 
पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असल्यामुळे विदर्भात येत्या बुधवारी व गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचीही शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. विशेषत: नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास पावसाची दाट शक्‍यता आहे. त्याचवेळी विदर्भात उन्हाचे चटकेही कायम राहणार आहेत. 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 
शहर तापमान 
नागपूर 44.1 
वर्धा 43.2 
अकोला 43.1 
ब्रह्मपुरी 43.0 
अमरावती 42.4 
चंद्रपूर 42.4 
यवतमाळ 42.0 
वाशीम 41.8 
गोंदिया 41.0 
गडचिरोली 40.8 
बुलडाणा 40.4 

Web Title: heat wave in Vidarbha