गोंदिया जिल्ह्याच्या चार तालुक्‍यांत अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, गोरेगाव, सालेकसा, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यातील शेंडा येथील देवराम दसाराम मानवटकर यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा जमीनदोस्त झाला तर, अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील केशोरी येथील खुशाल पेशने यांचे घर कोसळले. यात मोठे नुकसान झाले.

गोंदिया : जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, गोरेगाव, सालेकसा, अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यातील शेंडा येथील देवराम दसाराम मानवटकर यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा जमीनदोस्त झाला तर, अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील केशोरी येथील खुशाल पेशने यांचे घर कोसळले. यात मोठे नुकसान झाले.
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत कुठे तुरळक तर, कुठे दमदार हजेरी पाऊस लावत आहे. त्यामुळे शेतीकामांना वेगही आला आहे. बांध्यांत पाणी शिरत असल्याने बहुतांश ठिकाणी रोवणीची कामे प्रलंबित आहेत. बांध्यातील साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसते. दरम्यान, शुक्रवारी रात्री तर, शनिवारी सकाळी जिल्हाभर पावसाने दमदार हजेरी लावली. गोरेगाव तालुक्‍यात 73.47 मि.मी., अर्जुनीींमोरगाव 84.28, सालेकसा 79.67 तसेच सडक अर्जुनी तालुक्‍यात 84.33 मि. मी. पाऊस पडला असून, या चारही तालुक्‍यांत अतिवृष्टी झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. गोरेगाव तालुक्‍यातील 3 मंडळांपैकी गोरेगाव 82.8 मि. मी., मोहाडी मंडळात 92.3 मि. मी., अर्जुनी मोरगाव तालुक्‍यातील 5 मंडळांपैकी महागाव 119.6 मि. मी., नवेगावबांध 71.00, केशोरी मंडळात 115.8 मि. मी., आमगाव तालुक्‍यातील 4 मंडळांपैकी तिगाव 65.8 मि. मी., ठाणा मंडळात 70.4 मि. मी. तसेच सालेकसा तालुक्‍यातील सालेकसा 82.2 मि. मी., कावराबांध 78.6 मि. मी. तर, साखरीटोला मंडळात 78.2 मि. मी. इतका पाऊस झाला.
केशोरी येथील खुशाल पेशने यांचे घर पावसात कोसळले. मन्साराम बन्सोड यांच्या घरात पाणी शिरले असून, ते कोसळण्याच्या मार्गावर आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यातील शेंडा येथील देवराम मानवटकर यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा शुक्रवारी जमीनदोस्त झाला असून, घराचा काही भाग कोसळण्याचा मार्गावर आहे. यात मानवटकर यांचे मोठा नुकसान झाले. दोन दिवसांपूर्वी शेतकरी कृपासागर जनबंधू यांची सुरक्षा भिंत कोसळली. पंधरा दिवसांपूर्वी कोरडी पडलेली चुलबंद नदी आता तुडुंब भरून वाहत आहे.

कोयलारीचे तलाठी कार्यालय कुलूपबंद
शेंडा परिसरात आठवडाभरापासून पाऊस पडत आहे. त्यामुळे मातीच्या घरांची पडझड झाली आहे. शुक्रवारीदेखील दमदार पाऊस झाला. पीडित कुटुंब घटनेची माहिती देण्यासाठी कोयलारी येथील तलाठी कार्यालयात गेले असता कार्यालय कुलूपबंद होते. मागील दीड ते दोन महिन्यांपासून तलाठी रजेवर असल्याची माहिती आहे. त्यांचा कार्यभार बाह्मणी येथील तलाठी उपरीकर यांच्याकडे आहे. मात्र, ते कार्यालयात येत नसल्याची माहिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavey rainfall noted in gondia district