उपराजधानीला पावसाने धो-धो धुतले

उपराजधानीला पावसाने धो-धो धुतले

२४ तासांत १३२ मिलिमीटर
नागपूर - विदर्भात सक्रिय झालेल्या मॉन्सूनच्या पावसाने रविवारीही उपराजधानीला चांगलेच झोडपून काढले. दुपारी मेघगर्जनेसह बरसलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन प्रभावित झाले, वाहतूक व्यवस्था कोलमडली. अनेक ठिकाणच्या झोपडपट्टी व खोलगट भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले, चौकांचे तलाव बनले आणि झाडे पडली. दुचाकी व चारचाकी वाहने बंद पडल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप झाला. शहरात गेल्या चोवीस तासांत तब्बल १३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.  

शनिवारी रात्री पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारीही मुसळधार पावसाने नागपूरकरांची दाणादाण उडविली. दुपारी तीनच्या सुमारास विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह पावसाने अख्ख्या शहराला झोडपून काढले. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस साडेचारला थांबला. त्यानंतर सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरूच होता. पावसामुळे रामदासपेठ, सीताबर्डी, मेडिकल चौक, सदर, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, गोकुळपेठ, महाल, गांधीबाग, धरमपेठ, मानेवाडा, वर्धा रोड, खामला, सोमलवाडा, प्रतापनगर, छत्रपती चौक, नारा-नारी,  कोराडी रोड, काटोल रोड, कामठी रोडसह शहरातील अनेक ठिकाणी गुडघा ते कंबरभर पाणी साचले होते.

वर्धा रोड जॅम पॅक
पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीची कोंडी झाली. वर्धा मार्गावर पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नरेंद्रनगर पुलावरही मोठा जॅम लागला होता.  शहर पोलिस रात्री उशिरापर्यंत वाहतूक नियंत्रित करीत होते. शहरात झालेल्या दमदार पावसाने वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा झाले. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली होती. वर्धा रोड, रेडिसन ब्ल्यू हॉटेलपासून ते सेंट्रल पॉइंट हॉटेलपर्यंत तसेच खामला रोड आणि स्नेहनगरपासूनही वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. भरपावसात दुचाकीस्वारांनी कसाबसा मार्ग काढत  आगेकूच केली.

मेडिकल, मेयोमध्येही पाणी
पावसाचा फटका मेडिकल आणि मेयो रुग्णालयालाही बसला. मेडिकलमधील आपत्कालीन विभागासमोर पाणी साचल्याने परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. अतिदक्षता विभागासह अनेक वॉर्डांमध्ये पाणी शिरल्याने रुग्णांसह नातेवाइकांनाही त्रास झाला. मेयोमध्येसुद्धा हीच परिस्थिती होती. येथील जुन्या वॉर्डांमधील छताला गळती लागल्याने पाणी साचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com