मुख्यमंत्र्यांचे शिवार ‘जलयुक्त’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. परंतु एक दिवसाच्या मुसळधार पावसाने नागपुरातील विधान भवनातील सुरक्षा उघडी पडली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाण्यामुळे झालेल्या पडझडीची पाहणी करण्यासाठी बाहेर यावे लागले. 

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. परंतु एक दिवसाच्या मुसळधार पावसाने नागपुरातील विधान भवनातील सुरक्षा उघडी पडली आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाण्यामुळे झालेल्या पडझडीची पाहणी करण्यासाठी बाहेर यावे लागले. 

नागपुरात काल रात्रीपासून पाऊस सुरू झाला होता. मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत नागपुरात २४ तासांत ६१.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरवात झाली. या पावसाने विधान भवन परिसरातील खोल्यांमध्ये पाणी साचण्यास सुरवात झाली. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने विधान भवन परिसरातील पॉवर हाउसमध्ये पाणी घुसल्याने विधान भवन परिसराचा विद्युत पुरवठा खंडित करावा लागला. 

विधान भवनात पाणी शिरल्याने तसेच विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विधान सभेचे कामकाजही लवकरच उरकण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान भवनाची सुरक्षा विधानसभा अध्यक्षांकडे असते. त्यामुळे हरिभाऊ बागडे यांनी विधान भवनात येऊन पाण्यामुळे नेमके काय झाले, याची पाहणी त्यांनी केले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान भवन परिसरातील विद्युतपुरवठ्याची पाहणी केली. दुपारनंतरही पाऊस सुरूच असून, आणखी तीन दिवस मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनातील अडचणीत पुन्हा वाढण्याची शक्‍यता आहे.

पावसाळी अधिवेशन दरवर्षी मुंबईत होते. या वर्षी मुंबईतील मेट्रोचे काम, आमदार निवासाच्या सुरू असलेल्या बांधकामामुळे, पावसाळ्यामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळित होत असल्याने नागपुरात पावसाळी अधिवेशन घेण्याचा प्रस्ताव फडणवीस यांनी मांडला. या प्रस्तावास शिवसेनेने विरोध केला होता, त्याचप्रमाणे वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांचाही विरोध होता. मात्र, फडणवीस यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा करीत पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा हट्ट धरला.

शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. विधान भवनाच्या स्विचिंगपर्यंत पावसाच्या पाण्याची पातळी वाढली होती. यामुळे धोका निर्माण होण्याची भीती होती. तांत्रिक अडचण होऊ नये म्हणून वीजपुरवठा बंद केला. जनरेटरची व्यवस्था आहे; परंतु विधान भवनातील विजेचे लोड सहन करू शकत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केला होता. तासभरात पुन्हा पुरवठा सुरू करण्यात आला.
- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री.

मुख्यमंत्र्यांच्या बालहट्टामुळे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्यात आले आहे, परंतु नियोजन कोणतेही करण्यात आले नव्हते. नियोजनशून्य कारभाराने ही वेळ आली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे अब्रू गेली.
- धनंजय मुंडे,  विरोधी पक्षनेते, विधानसभा

Web Title: heavy rain in nagpur