साकोली तालुक्‍यात अतिवृष्टी; घरांची पडझड

File photo
File photo

साकोली,(भंडारा) : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासांत साकोली तालुक्‍यात 146 मि.मी. पाऊस पडला असून अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. या पावसामुळे तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र दिसून आले. नदी, नाले व ओढे दुथडी भरून वाहत असून कमी उंची रस्ते व पूल जलमय झाल्याने या मार्गावरील संपर्क तुटला होता.

साकोली तालुक्‍यात 1 जून ते 13 ऑगस्टपर्यंत 789.9 मि.मी. पाऊस झाला आहे. मंगळवारी साकोली मंडळात 146.3 मि.मी., एकोडी मंडळात 166 मि.मी. तर सानगडी मंडळात 77 मि.मी. पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना रोवणीसाठी पाण्याची उणीव जाणवत नसली तरी अतिपावसामुळे रोवण्यात खंड पडल्याचे जाणवले. तालुक्‍यात खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अशा ठिकाणी असणाऱ्या गावांतील घरांमध्येसुद्धा पाणी पोहोचले. सेंदुरवाफा परिसरात राष्ट्रीय महामार्गावरसुद्धा सर्व परिसर जलमय झाल्याचे चित्र होते.
चुलबंद प्रकल्पाचे पाणी शेतात
कुंभली येथील निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी अडविण्यात आले. परंतु, तालुक्‍यात मुसळधार पाऊस झाल्याने जलस्तर मोठ्या प्रमाणात वाढला असून साठविलेले पाणी लवारी गावांतील शेतींमध्ये पोहोचले आहे. शेकडो एकर शेती जलमय झाली असून, शेतकरी संकटात सापडले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. उपाययोजना करण्यासाठी प्रकल्पाची दारे खुली करणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रकल्पविभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरुन कळवूनही दखल घेण्यात आली नाही.

पालांदूर, सिहोऱ्यात तुटला संपर्क
पालांदूर: लाखनी तालुक्‍यातील नवीन मऱ्हेगाव ते जुना मऱ्हेगावकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरील रस्त्यावरुन तीन फूट पाणी वाहत आहे.
या गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक बंद पडली आहे. तसेच नळयोजनेच्या विहिरीत पुराचे पाणी शिरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. सिहोरा : कर्कापूर-रेंगेपार(पांजरा) दरम्यानच्या सिलेगावजवळील पुलावरुन पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com