वर्धा, अमरावती, गडचिरोलीत मुसळधार पाऊस

File photo
File photo

नागपूर : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा अमरावती, वर्धा आणि गडचिरोलीकरांना झोडपले. जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक भागांत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र, पूरस्थिती ओसरल्याने बहुतांश मार्गाची वाहतूक गुरुवारी (ता.5) सकाळपासून सुरू झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्‍यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुटी जाहीर
केली आहे. गडचिरोलीत शहरात बुधवारी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेकडो घरामध्ये पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात सामानाचे नुकसान झाले. सततच्या पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली तसेच मुलचेरा लगतच्या दिना नदीच्या पुरामुळे आष्टी मार्ग बंद होता. पुराचे पाणी उतरल्याने आज वाहतूक सुरळीत सुरू झाली. जिल्ह्यात आज दिवसभर कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यातील पावसाने जोरदार हजेरी लावली.
सेलू तालुक्‍यात 89 मिलिमीटर पाऊस झाला. आष्टी तालुक्‍यात 79.53 मिलिमीटर, आर्वी तालुक्‍यात 66 मिलिमीटर, कारंजा तालुक्‍यात 47.88 मिलिमीटर, समुद्रपूर तालुक्‍यात 45.85, वर्धा तालुक्‍यात 34.71 मिलिमीटर, देवळी तालुक्‍यात 18.26, तर हिंगणघाट तालुक्‍यात सर्वांत कमी 9.30 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 84.97 टक्के पाऊस पडला आहे. या महिन्यात वार्षिक पर्जन्यमानाचा आकडा पार होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यातील अनेक लहानमोठे प्रकल्प भरले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्प कोरडे असल्याची ओरड सुरू होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक प्रकल्प भरले आहेत. अमरावती जिल्हृयातील अनेक भागात पाऊस झाला. नदी-नाले ओसंडून वाहत असून काही नद्यांना पूर आला. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com