यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा एक बळी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

यवतमाळ : संततधार पावसामुळे सालोड (ता. यवतमाळ) येथील एका महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने तिचा मृत्यू झाला. तर, पांढरकवडा येथील शेतकरी आपल्या पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात जात असताना तोल गेल्याने वाहून गेल्याची घटना पांढरकवडा येथे मंगळवारी (ता.30) घडली.

यवतमाळ : संततधार पावसामुळे सालोड (ता. यवतमाळ) येथील एका महिलेच्या अंगावर घराची भिंत पडल्याने तिचा मृत्यू झाला. तर, पांढरकवडा येथील शेतकरी आपल्या पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात जात असताना तोल गेल्याने वाहून गेल्याची घटना पांढरकवडा येथे मंगळवारी (ता.30) घडली.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने यवतमाळ तालुक्‍यातील सालोड येथील ऊर्मिला दिनेश जैस्वाल (वय 50) यांच्या अंगावर घराची भिंत पडली. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. तसेच पिकांची पाहणी करण्यासाठी नदीवरील पूल ओलांडून जात असलेल्या शेतकऱ्याचा अचानक तोल गेला. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून तो वाहून गेल्याची धक्कादायक घटना पांढरकवडा तालुक्‍यातील वाराकवठा गावात घडलेली आहे. कालिदास बळीराम ठाकरे (वय 41) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पुलावरून जात असलेल्या काहींनी आरडाओरडा करताच गावातील नागरिक गोळा झाले. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा येथील तहसीलदार सुरेश कव्हळे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद झळके घटनास्थळी दाखल झाले. यावेळी शोधकार्यासाठी भोई बांधवांना ट्यूबच्या साहाय्याने पाण्यात उतरविण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्काळ पावले उचलून "एनडीआरएफ'च्या पथकाला या ठिकाणी पाठविण्यात आले. दिवसभर सुरू केलेल्या रेस्क्‍यू ऑपरेशनमध्ये एनडीआरएफच्या पथकाने जवळपासच्या संपूर्ण परिसरात पाहणी करून पुढील भागातदेखील जोरदार शोधमोहीम राबविली. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ठाकरे यांचा थांगपत्ता लागला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rains claim one death