मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना भरती

 नांद : परिसरात शिरलेले नांद नदीच्या पुराचे पाणी.
नांद : परिसरात शिरलेले नांद नदीच्या पुराचे पाणी.

नांद (जि.नागपूर)  : चार-पाच दिवसांची उघाड देऊन पुन्हा पावसाने जोरदार कोसळणे सुरू केल्याने नांद परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे कर्मचारीही स्वठिकाणी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंदच आहेत, तसेच चिखलापार गावात पुराचे पाणी घुसल्याने तेथील नागरिकांची दुसऱ्यांदा तारांबळ उडाली.
रविवारी रात्री तीनपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशीही सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. सकाळी 7 वाजेपर्यंत 81 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. नांद नदी, महालगाव नदी, सिर्सीची नदी यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे सकाळपासूनच वाहतुकीला "खो' बसला. नांद नदीला पूर आल्याने लोणारा, धामणगाव (ग), वणी, आलेसूर, खोलदोडा, पांजरापार, चिखलापार, भिवी, झमकोली, बेल्लरपार, भगवानपूर, सायगाव, खरकाडा, खापरी, पोळगाव, बेसूर, चारगाव व इतर गावाचा नांद, उमरेड, भिवापूर गावांशी संपर्क तुटला. शाळेत पाणी घुसल्याने तेथील नागरिक भयभीत झाले होते. चिखलापार येथील शाळा आज बंदच होती. कारण त्या शाळेतील शिक्षक बाहेरगावी उमरेडला राहत असल्याने पुरामुळे पोहोचू शकले नाहीत. चिखलापार गावात नेहमी नांद नदीचे पुराचे पाणी जात असते. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागते. नांद नदीकाठावरील शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महालगाव येथील नदीवरील पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे व डायव्हर्शन रस्ता वाहून जात असल्याने त्या मार्गावरील व वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वीही घडलेल्या घटना
काही दिवसांपूर्वी या नदीला आलेल्या पुरामुळे व तात्पुरता बनवलेला रस्ता वाहून गेल्यामुळे दोन दिवसांच्या बाळासहित त्याची आई अडकली होती. तेव्हा पोकलेन मशीनच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढावे लागले. महालगाव परिसरातील नागरिकांनी या नदीवरील पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूुर्ण करून रहदारीसाठी मोकळा करावा, अशी मागणी केली आहे. बांधकाम कासवगतीने होत असल्याने त्रास सहन करावा लागतो अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com