esakal | विदर्भात दमदार पाऊस : अकोल्यात अतिवृष्टी, अमरावतीत संततधार
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भात दमदार पाऊस : अकोल्यात अतिवृष्टी, अमरावतीत संततधार

विदर्भात दमदार पाऊस : अकोल्यात अतिवृष्टी, अमरावतीत संततधार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : थोडी ओढ दिल्यानंतर पावसाचे दमदार पुनरागमन झाले असून गेले दोन दिवसांपासून पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांत व पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यात संततधार सुरू आहे. त्यामुळे नदीनाले तुडुंब भरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. या तालुक्यात ७५० हून अधिक हेक्टर शेतीतील पीक वाहून गेले. पुरामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात धरणाचे बॅकवॉटर अनेक गावांमध्ये शिरले. तर अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या पुराचे पाणी लगतच्या वस्त्यांमध्ये शिरले. समुद्रपूर तालुक्यात (जि. वर्धा) दोन व्यक्ती, तर राजुरा तालुक्यात (जि. चंद्रपूर) एक शेतकरी असे तिघे जण पुरात वाहून गेले. चिखली तालुक्यात एका वृद्धाचा भिंत पडल्याने मृत्यू झाला. (Heavy-rains-in-Vidarbha-Rain-News-River-And-Nala-Tudumba-nad86)

अकोला जिल्हा

अकोला जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८४ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला. अतिवृष्टीने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके खरडून गेली. बार्शीटाकळी तालुक्यात निर्गुणा नदीला आलेल्या पुरात आळंदा येथील अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली. अकोला शहर व परिसरात मोर्णा नदीच्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले. अकोला जिल्ह्यात २६ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वटफळ आणि कुंभी गावाशेजारील असलेला पाझर तलावाला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे पाझर तलावाखाली असलेली शेती खरडून गेली आहे. जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.मानोरा तालुक्यातील सेवादास नगर ते वरोली दरम्यान असलेल्या बंधाऱ्यावरून शेतकरी शेतात जात असताना अचानक पाणी वाढल्याने वरोली येथील शेतकरी अडकला होता.

हेही वाचा: थक्क करणारा प्रवास! ८० रुपये ते दोन कोटींचा मालक व चार उद्योग

बुलडाणा जिल्हा

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांपासून पावसाची रिपरिप सुरू असून, जिल्ह्यात लोणार तालुक्यात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली आहे. लोणार तालुक्यात अतिवृष्टी पावसामुळे खूरमपूर नदीच्या पुराने दहा ते बारा शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथील ६५ वर्षीय वृद्ध घरात झोपलेले असताना २१ जुलैला अचानक रात्रीच्या वेळी घराची भिंत कोसळली. त्याखाली दबून सदर वृद्ध मृत्यू झाला.

अमरावती जिल्हा

अमरावती जिल्ह्यात बुधवारपासून संततधार सुरू आहे. नदीनाल्यातील पाणीपातळी वाढली असून मेळघाटातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरासरी २०.३ मि.मी. पाऊस झाला. पावसाचा जोर वाढल्याने अचलपूर तालुक्यातील सापन धरणाची, तर चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाची सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांत बुधवारी पावसाने जोर धरला. सिपना नदीने हरिसाल येथील उंच पुलाचा कठडा गाठला आहे. जिल्ह्यातील पिली, पेढी, पूर्णा, शहानूर या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मेळघाटात अनेक रस्त्यांवरील खोलगट पुलावरून पाणी वाहत असल्याने ५० ते ६० गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा: हाडांचा ठिसूळपणा : आहारातून ‘या’ घटकांचे प्रमाण करा कमी

वर्धा जिल्हा

वर्धा जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सर्वदूर पाऊस सुरू आहे. मात्र, पावसाचा जोर कमी आहे. नदी, नाले, धरणांची पाणीपातळी वाढली असून काही भागात शेतात पाणी साचले आहे. गुरुवारी निम्न वर्धा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. संततधार पावसाने नदी नाले ओसंडून वाहत असल्याने २० गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा: बालायाम योग : वाचा किती सुरक्षित आहे हा व्यायाम व फायदे

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक मार्गे बंद पडले आहेत. राजुरा तालुक्यातील एक शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेला. चंद्रपूर शहरातील वडगाव, रहेमतनगरातील वस्त्यांत पाणी शिरले. राजुरा तालुक्यातील गोवरी गावाला बॅकवॉटरचा फटका बसला. या गावातील अनेक घरे पाण्याखाली आली. याच तालुक्यातील रामपूर परिसरातील काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता असून जिल्हा प्रशासनाने वैनगंगा नदीकाठीच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वर्धा जिल्ह्यातील लाला नाला सिंचन प्रकल्प भरल्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्ह्यात चार तालुक्यांतील २८8 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आहे. अतिवृष्टीने उमरखेड तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले व ३४ घरांची पडझड झाली. ७५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दिग्रस, पुसद, आर्णी व महागाव या तालुक्यांना देखील पावसाचा फटका बसला आहे. बाभूळगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाचे दोन दरवाजे किंचित उघडण्यात आले. अतिवृष्टीने ७८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. त्यात उमरखेड तालुक्यातील ७५०, पुसद ३० व झरी जामणी या तालुक्यांतील शेतजमिनीचा समावेश आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीचे पाणी चातारी गावात पाणी शिरले. अनेक भागांतील दळणवळण ठप्प झाले होते.

हेही वाचा: मनपा शाळेत प्रवेशासाठी गर्दी; चंद्रपुरातील शाळेत दिल्ली पॅटर्न

तीन जण वाहून गेले

वर्धा जिल्ह्यात दोघे जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. समुद्रपूर तालुक्यातील नाल्याला पूर आल्याने समुद्रपूर येथील रंभाबाई नामदेव मेश्राम (७०) ही महिला शेतातून परतताना वाघाडी नाल्यावरील पुलावरून पाय घसरल्याने वाहून गेली. तर दुसरी घटना तालुक्यातील तास येथे घडली. येथे गावालगतच्या नाल्याला पूर आला. या पुरात शेतकरी संतोष पंढरी शंभरकर हे शेतातून परत येत असताना बंडीबैलासह वाहून गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील भेदोडा (ता. राजुरा) येथील चंदू बिलावार हा शेतकरी दुचाकी गावाकडे येत होता. भेदोडा नाल्याला पूर होता. त्याने पाण्यातून दुचाकी टाकली. पाण्याला वेग असल्याने पुराच्या पाण्यात तो वाहून गेला. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.

हेही वाचा: ‘दादा.... मी प्रियकरासोबत पळून जात आहे, प्लीज शोध घेऊ नको’

नागपूर जिल्हा

बुधवारी दिवसभर फटकेबाजी करणाऱ्या वरुणराजाने आजही दमदार हजेरी लावून नागपूरकरांना चिंब भिजविले. दुपारी व सायंकाळी बरसलेल्या जोरदार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडविली. धो-धो पावसाने रस्त्यांवर जागोजागी पाणी तुंबले, अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. शहरात चोवीस तासांत तब्बल ७९ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवारीही नागपूरसह विदर्भात जोरदार पावसाचा इशारा दिल्याने गुरुपौर्णिमाही पावसातच जाण्याची चिन्हे दिसत आहे.

(Heavy-rains-in-Vidarbha-Rain-News-River-And-Nala-Tudumba-nad86)

loading image