व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी 

दीपक खेकारे 
शनिवार, 28 डिसेंबर 2019

डॉ. जीवने नारंडा येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्याने कोरपना येथे खासगी रुग्णालय सुरू केले. पीडित युवती याच रुग्णालयात 2016 पासून काम करीत होती. 

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : रुग्णालयात काम करणाऱ्या युवतीचे नग्न छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल केले. तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. दरम्यान, युवतीचे लग्न जुळले. तिचे लग्न होऊ नये म्हणून डॉक्‍टरने ती नग्न छायाचित्रे युवतीच्या होणाऱ्या पतीला मोबाईलवर पाठविली. लग्न केल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. युवतीने पोलिसात तक्रार नोंदविल्यानंतर कारवाईच्या भीतीने डॉक्‍टर महाशयाने गावातून पोबारा केला. सध्या तो फरार आहे. 

 

Image may contain: 1 person
डॉक्‍टर आकाश जीवने

नारंडा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी 

पेशाला न शोभणारे कृत्य करणाऱ्या या डॉक्‍टरचे नाव आकाश जीवने आहे. तो कोरपना तालुक्‍यातील नारंडा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तसेच कोरपना येथे त्याने खासगी रुग्णालयसुद्धा थाटले आहे. डॉ. जीवने विवाहित असून त्याची पत्नीसुद्धा डॉक्‍टर आहे. डॉ. जीवने नारंडा येथील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्याने कोरपना येथे खासगी रुग्णालय सुरू केले. पीडित युवती याच रुग्णालयात 2016 पासून काम करीत होती. 

डॉक्‍टरने लपून काढली नग्न छायाचित्रे

रुग्णालयासोबतच ती युवती जीवने यांच्या घरचीही कामे करायची. दोन्ही ठिकाणी कामे करीत असल्याने तिला अनेकदा घरी जायला उशीर व्हायचा. त्यामुळे ती डॉक्‍टर जीवने यांच्याच घरी अंघोळ आणि जेवण करायची. याच काळात डॉक्‍टरने लपून युवतीचे अंघोळ करतानाचे नग्न छायाचित्रे स्वतःच्या मोबाईलने काढलीत. त्यानंतर तिला ती छायाचित्रे दाखवून ब्लॅकमेल करणे सुरू केले. तिच्याकडे शरीर सुखाची मागणीसुद्धा केली. गरीब बिचाऱ्या त्या युवतीने बदनामी होईल या भीतीने डॉक्‍टरचा संपूर्ण अत्याचार निमुटपणे सहन केला. 

 

हेही वाचा- 'ती'च्या आब्रुला नातेवाईक, परिचितांकडूनच धोका

 

लग्न मोडण्यासाठी जीवे मारण्याची धमकी

काही दिवसांपूर्वी त्या युवतीचे लग्न जुळले. साक्षगंधही झाले. डॉक्‍टरला हे माहीत होताच तो बिथरला. युवती लग्न होऊन गेल्यानंतर आपले कसे? म्हणून त्याने साक्षगंधाच्या दुसऱ्याच दिवशी युवतीच्या होणाऱ्या पतीच्या मोबाईलवर तिची नग्न छायाचित्रे पाठविली. "ती माझी रखेल आहे. तिच्याशी तू लग्न करू नको' असा मॅसेजही त्याने अश्‍लील फोटोंसोबत पाठविला. हे फोटो बघून हादरलेल्या मुलाने युवतीसोबत लग्न करण्यास नकार दिला. परंतु दोन्ही बाजूंच्या मंडळींनी मुलाची समजूत काढली. त्यानंतर तो लग्नाला तयार झाला. युवक लग्नाला तयार झाल्याचे माहीत होताच डॉ. जीवने याने त्याला मोबाईलवर फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या युवकाने लग्न करण्यास पुन्हा नकार दिला. 

पोलिसात तक्रारीनंतर डॉक्‍टर फरार

या घटनेमुळे तरुणीच्या कुटुंबीयांवर अक्षरशः आभाळ कोसळले. अखेर पीडितेचे आई-वडील आणि गावकऱ्यांनी डॉ. जीवने याची पोलिसात तक्रार करण्याचे ठरविले. शुक्रवारी (ता.27) रात्री 2.15 वाजता कोरपना पोलिसात ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी डॉ. जीवने विरोधात गुन्हा दाखल केला. डॉक्‍टरला याची माहिती होताच पोलिस पोहोचण्यापूर्वीच त्याने गावातून पळ काढला. सध्या तो फरार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hey Doctor! Demand for Sex to young Girl