वाहतूक नियम मोडणाऱ्या 474 चालकांचे लायसन्स बनावट

वाहतूक नियम मोडणाऱ्या 474 चालकांचे लायसन्स बनावट

नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकांचे वाहन चालवण्याचे परवाने जप्त करण्यात आले. त्यापैकी 474 जणांच्या परवान्यांचा लेखाजोखा उपलब्ध नाही. शिवाय ते परवाने बनावट असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. हा अतिशय गंभीर प्रकार असल्याने न्यायालयाने पुढील आठवड्यात सर्वांना सूचना मागवल्या आहेत. 
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या, अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकारासंदर्भात उच्च न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर मुख्य सविवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. मुख्य सचिवांनी विभागीय आयुक्तांची उपसमिती स्थापन केली. वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईची माहिती सादर केली असता, न्यायालयाने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते. त्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर नामेदव मनवर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानुसार, 31 मे 2019 पर्यंत शहरात 17 लाख 8 हजार 500 वाहनांची नोंद आहे. 2017 साली वाहतूक पोलिसांनी 1 हजार 529 वाहनांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी 783 जणांचे परवाने निलंबित केले. तर 248 जणांची प्रकरणे प्रादेशिक परिवहन उपायुक्त, नागपूर पूर्वकडे, 18 नागपूर ग्रामीण आणि 6 वर्धा कार्यालयाला पाठवण्यात आले. उर्वरित 474 वाहनचालकांच्या परवान्यांचा लेखाजोखा सापडला नाही. त्यामुळे ते बनावट असावेत, अशी शंका व्यक्त करण्यात आली. 
2018 साली 2 हजार 454 प्रकरणांपैकी 1 हजार 272 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले. यात मद्यप्राशन करून वाहन चालवणे, भरधाव वाहन चालवणे आणि वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्यांचा समावेश आहे. 2019 साली जानेवारी व फेब्रुवारीमध्ये वाहतूक पोलिसांनी 563 प्रकरणे पाठवली. त्यापैकी 154 जणांचे परवाने निलंबित केले असून, 117 प्रकरणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर पूर्वकडे पाठवली आहेत. तर 173 प्रकरणांवर कारवाई सुरू असून, 119 जणांचे परवान्यांची माहिती जुळत नाही. त्यामुळे बनावट वाहन परवान्यांची चिंता व्यक्त करून हा गंभीर विषय असल्यामुळे सर्व पक्षकारांना पुढील सुनावणीला युक्तिवाद करण्यास सांगितले. न्यायालयीन मित्र म्हणून ऍड. श्रीरंग भांडारकर आणि राज्य सरकारतर्फे ऍड. सुमंत देवपुजारी यांनी बाजू मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com