उच्च न्यायालयाच्या "धक्‍क्‍याने' मनपाचे खड्ड्यांवर "लक्ष' 

file photo
file photo

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला कठोर शब्दांमध्ये खडसावल्यानंतर महापालिका खडबडून जागी आली आहे. शहरातील विविध मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे, आजवर 11 हजार 506 खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली. 
तर, खड्ड्यांबाबत तक्रार करण्यासाठी वाहतूक पोलिस विभागासह महापालिकेने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. नागपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पावसामुळे आणि जड वाहतुकीमुळे मोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांमुळे विविध 22 घटनांत एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 29 नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे, हे प्रकरण उच्च न्यायालयाने गंभीरतेने घेत स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. सुनावणीदरम्यान रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. 
त्यानंतर, खडबडून जागे होत महापालिकेच्या दहाही विभागांत येणाऱ्या वस्त्यांमधील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाच्या लोककर्म विभागाने मोहीमच हाती घेतली आहे. या अंतर्गत 24 ऑक्‍टोबरपर्यंत 8 हजार 960 लहान-मोठे खड्डे बुजविण्यात आले. सुमारे 2 लाख 59 हजार 657.13 वर्ग मीटरच्या क्षेत्रफळावरील हे खड्डे होते. तर, सुमारे 2 हजार 546 खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात आले आहेत. 32 हजार 936.92 वर्गमीटर क्षेत्रफळात हे खड्डे होते, असे एकूण 11 हजार 506 खड्डे महापालिकेतर्फे बुजविण्यात आले. यापैकी, 1 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत 73 हजार 250.8 वर्गमीटरवरील 2,942 खड्डे आणि 20 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबर या कालावधीत जेट पॅचर मशीनने बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांची संख्या 454 इतकी आहे. 
या मार्गावर होते खड्डे 
महापालिकेने या मोहिमेंतर्गत दहा विभागांतील शहराच्या विविध भागांतील खड्डे बुजविले आहेत. यामध्ये, आकाशवाणी चौक ते काटोल नाका मार्गातील 33, क्रीडासंकुल ते पागलखाना चौक मार्गावरील 13, मोक्षधाम ते बसस्टॉप मार्गातील 23, मानस चौक ते कॉटन मार्केट 43, भांडेवाडी ते बिदामल मार्गातील 45, धंतोली लोखंडी पुलाजवळील 14, खामला परिसरातील 17, जयप्रकाशनगर परिसरातील 25, व्हीसीए चौक ते उच्च न्यायालय मार्गातील 12, वाठोडा रिंगरोड ते चांदमारी मार्गातील 21, मेयो हॉस्पिटल परिसरातील 17, बस स्टॉप ते डालडा कंपनी मार्गातील 24, मोठा ताजबाग परिसरातील 40, नंदनवन सिमेंट रोड ते जगनाडे चौक मार्गावरील 81, मेहंदीबाग सिमरन हॉस्पिटल मार्गावरील 20, अजनी परिसरातील 81, इंदोरा चौकातील 41, प्रतापनगर चौकातील 25, उच्च न्यायालय ते जपानी गार्डन मार्गावरील 18, कॉफी हाऊस चौकातील 20, मानकापूर फरस ते गोधनी रोड मार्गावरील 23, तुकडोजी पुतळा ते वंजारीनगर मार्गावरील 43, एलएडी चौकातील 30, एलएडी चौक ते जपानी गार्डन मार्गावरील 40, तपोवन, गोविंदनगर परिसरातील 36 खड्ड्यांचा समावेश आहे. 
ऑनलाइन तक्रारींचीही दखल 
नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी मनपाकडे करणे सोयीचे व्हावे यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्वतंत्र खड्डे तक्रार निवारण कक्षाची निर्मिती करण्यात आली असून या सेलमार्फत ई-मेल, फेसबुक, ट्‌विटरवर आलेल्या तक्रारी संबंधित झोनकडे पाठवून त्याची माहिती दिली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन ते तीन दिवसांच्या आत या तक्रारींचे निरसन केले जाते. तक्रारकर्त्यांना फोटोसह याबाबतची माहिती कळविली जात आहे. नागपूर मनपाने उपलब्ध करून दिलेल्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत अडीचशेवर तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी दीडशेंवर तक्रारींचे निरसन करण्यात आलेले आहे. 
खड्ड्यांची माहिती द्या : आयुक्त 
शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांसंदर्भात मनपाच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्‌विटरवर पेजवर नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. तसेच, तक्रार करण्याकरिता potholecomplaints@gmail.com हा ई-मेल आयडीदेखील उपलब्ध करून दिला आहे. सोबतच, खड्ड्यांबाबत माहिती देताना तक्रारकर्त्याने आपले नाव, मोबाईल क्रमांक व खड्ड्यांच्या ठिकाणांची नोंद अवश्‍य करावी, असेही बांगर यांनी म्हटले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com