सोळाशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला मिळणार उजाळा !

सोळाशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला मिळणार उजाळा !

कालिदास महोत्सवात उत्खननातील पुराव्यांचे प्रदर्शन
नागपूर - वीस वर्षे वाकाटकांचे राज्य एकहाती सांभाळणाऱ्या प्रभावती गुप्त यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कदाचित पहिलावहिला महोत्सव यंदा नगरधनच्या किल्ल्यावर होऊ घातला आहे. महोत्सव कालिदासांच्या नावाने असला तरीही त्यानिमित्ताने तब्बल साडेसोळाशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाला मिळणारा उजाळा, महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

कालिदास महोत्सव रामटेक येथील कालिदास स्मारकावर व्हावा, अशी अनेक वर्षांपासून स्थानिकांची इच्छा होती. त्यानुसार गेल्यावर्षी महोत्सवाचे आयोजन स्मारक परिसरात झाले. मात्र, यावर्षी नगरधन किल्ल्याच्या आतील भागात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. रामटेकमधील महोत्सव पळविण्याच्या उद्देशाने नगरधनला आयोजन करण्यात आल्याची ओरड काही लोकांनी केली. पण, खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी कालिदासाने सर्वांत पहिले पाऊल ठेवले तेथेच यंदाचा महोत्सव होतोय, हे अधिक महत्त्वाचे आहे. इ. स. 380 मध्ये रुद्रसेन द्वितीय या वाकाटक राजाशी विवाह झाल्यानंतर प्रभावती गुप्त नगरधन येथे आल्या. त्यानंतर पाचच वर्षांनी पतीचे निधन झाले आणि प्रभावती गुप्त यांनी पुढील वीस वर्षे एकहाती सत्ता सांभाळली. त्याच कालावधीत कालिदास याठिकाणी येऊन गेले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. विशेष म्हणजे "श्रीरामगिरी स्वामिनी' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पर्वतावर प्रभावती गुप्त यांनी राज्य चालवित असतानाच श्रीराम मंदिराची स्थापना केली, अशी नोंद इतिहासात आहे.

कालिदास स्मारकापासून जवळच असलेल्या केवल नृसिंह मंदिरात प्रभावती गुप्त यांच्या नावाचा उल्लेख असलेला शिलालेख काही वर्षांपूर्वी सापडला आणि यावर्षी नगरधन किल्ल्यावरील उत्खननात मातीची मुद्रा सापडली. प्रथमदर्शनी, प्रभावती गुप्त याच खऱ्या अर्थाने या भागातील सर्वांत पहिली प्रभावशाली महिला ठरतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पुरातत्त्व विभागाने यावर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत केलेल्या उत्खननात त्यांच्या साम्राज्याचे अस्तित्व सिद्ध करणारे अनेक पुरावे हाती लागले. या सर्व पुराव्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन 20 नोव्हेंबरला कालिदास महोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांना बघता येणार आहे.

यावर्षी केलेल्या उत्खननात प्रभावती गुप्त यांची मातीची मुद्रा हाती लागली. यासोबतच वाकाटकांच्या राजधानीचे वैभव दर्शविणाऱ्या अनेक गोष्टी सापडल्या. त्याच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आम्ही महोत्सवाच्या निमित्ताने लावणार आहोत.
- डॉ. विराग सोनटक्के, सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com