हायटेंशन लाइनचा आणखी एक बळी

File photo
File photo

हायटेंशन लाइनचा आणखी एक बळी
नागपूर : उपराजधानीत हायटेंशन लाइनने आणखी एकाचा बळी घेतला. वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी नातेवाइकाकडे गेलेले पिता आणि मुलगी उच्चदाब वीजवाहिनीच्या संपर्कात आले. यात पित्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलगी जखमी झाली. कळमना परिसरातील विजयनगरात गुरुवारी रात्री ही घटना घडली.
अभिमन्यू यादव (25, रा. जाटतरोडी, इमामवाडा) असे मृताचे तर मयूरी यादव (5) असे जखमी मुलीचे नाव आहे. यादव यांचे नातेवाईक रामकुमार निर्मलकर यांनी विजयनगरातील दुर्गामंदिरजवळ नवीन घर बांधले आहे. गुरुवारी त्यांच्याकडे वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता. अभिमन्यू पत्नी आणि मुलीला सोबत घेऊन कार्यक्रमासाठी गेला होता. अंगणात कार्यक्रम सुरू होता. अभिमन्यू मुलीला सोबत घेऊन घर बघत बघत गच्चीवर गेले. वरून उच्चदाब वीजवाहिनी गेली असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. गच्चीवर दोघे सोबत खेळत होते. अभिमन्यूने मुलीला उचलले आणि नेहमीप्रमाणे वर फेकत होता. हा प्रकार सुरू असताना मुलगी तारांच्या संपर्कात आली. अभिमन्यूने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलगी खाली पडली. पण, अभिमन्यू तारांच्या संपर्कात आला. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मयूरी सुदैवाने बचावली. गच्चीवर लख्ख प्रकाश झाला आणि मयूरी रडू लागल्याने पाहुण्या मंडळींनी गच्चीवर धाव घेतली. या घटनेमुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
काही महिन्यांपूर्वी सुगतनगरातील रहिवासी धर कुटुंबातील अकरा वर्षीय जुळ्या भावंडांचा उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे जीव गेला. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
मनपा, एनआयटीचे अधिकारी अडचणीत येणार
न्यायालयाने संपूर्ण बाबीची गांभीर्याने दखल घेतली अन वेळोवेळी अनेक निर्णय दिले आहेत. हायटेंशन लाइनसंदर्भात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. हायटेंशन लाइनखाली राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी समितीही तयार करण्यात आली आहे. कोर्टाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. आता या प्रकरणामुळे मनपा, एनआयटीचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com